ताकामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात, ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. लॅक्टिक ॲसिड असलेलं एक ग्लास ताक प्यायल्याने पोटातील ॲसिडिटी नियंत्रणात राहते.
मुंबई : ॲसिडिटी म्हणजे पोटात गरजेपेक्षा जास्त ॲसिड तयार होणं. यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि अपचनाचा त्रास होतो. जास्त मसालेदार किंवा तेलकट खाणं, चहा-कॉफी, दारू, ताणतणाव आणि जेवल्या जेवल्या लगेच झोपणं ही यामागची मुख्य कारणं आहेत. ॲसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर ठरतात, ते आपण पाहूया...
आलं
आल्यामुळे पोटाला मोठा दिलासा मिळतो. यात 'जिंजरॉल' (Gingerol) नावाचा घटक असतो, जो नैसर्गिकरित्या सूज कमी करतो. यामुळे पचनक्रियाही वेगवान होते. रोज सकाळी एक ग्लास आल्याचा चहा प्यायल्यास ॲसिडिटीपासून आराम मिळतो.
ताक
ताकामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात, जे ॲसिडिटी दूर करतात. लॅक्टिक ॲसिड असलेलं एक ग्लास ताक पोटातील ॲसिडिटीची पातळी नियंत्रित ठेवायला मदत करतं. पचन सुधारण्यासाठी यात थोडी भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून प्यायल्यास अधिक फायदा होतो.
बडीशेप
जेवणानंतर बडीशेप चावून खाणं खूप फायदेशीर असतं. पोटभर जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशेप खाल्ल्याने 'अनेथोल' (Anethole) नावाचा घटक शरीरात तयार होतो. हा घटक पोटाच्या स्नायूंना आराम देतो, पोट फुगणं कमी करतो आणि ॲसिड रिफ्लक्स (छातीत जळजळ) थांबवतो. याशिवाय, ठेचलेली बडीशेप पाच मिनिटे गरम पाण्यात उकळून तुम्ही 'बडीशेप चहा' म्हणूनही पिऊ शकता. यामुळे पोटाला आराम मिळतो आणि तोंडाची दुर्गंधी जाऊन श्वासही फ्रेश राहतो.
केळं
पिकलेल्या केळ्यांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. हे पोटॅशियम पोटातील ॲसिडविरुद्ध नैसर्गिक अँटासिड म्हणून काम करतं. मुख्य जेवणाआधी एक केळं खाणं फायदेशीर ठरतं. याचा गोडवा खाण्याची इच्छा नियंत्रित करतो आणि ॲसिडिटी होण्यापासून वाचवतो.
नारळपाणी
नारळपाणी शरीराला हायड्रेट ठेवतं. पचनसंस्था थंड ठेवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यातील इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील पीएच (pH) पातळी संतुलित ठेवायला मदत करतात. यामुळे ॲसिडिटी कमी होते. नारळपाणी प्यायल्याने फक्त तहानच भागत नाही, तर पचनक्रियाही सुधारते.
ओवा
जेवणानंतर पोट फुगल्यासारखं किंवा जड वाटत असेल, तर अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत चावून खा. यात 'थायमोल' (Thymol) नावाचा घटक असतो, जो पचनास मदत करणाऱ्या गॅस्ट्रिक ज्यूसची निर्मिती वाढवतो.









