दारू पिणं आरोग्यासाठी वाईट आहेच, पण त्यासोबत तुम्ही 'चखणा' म्हणून काय खाता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. बिअर, व्हिस्की किंवा रम पिताना काही पदार्थ खाल्ल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घ्या कोणते पदार्थ टाळावेत.

दारू पिताना सोबत काहीतरी 'साईड डिश' किंवा 'चखणा' लागतोच. चिकन फ्राय, कबाब, चिप्स, लोणचं किंवा शेंगदाणे हे तर एकदम पॉप्युलर कॉम्बिनेशन्स आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, दारू जशी आरोग्यासाठी धोकादायक आहे, तसेच काही पदार्थ दारूसोबत खाल्ल्यास ते आरोग्याला आणखी जास्त नुकसान पोहोचवतात. त्यामुळे दारू पिताना तुम्ही साईड डिश म्हणून काय खाता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चला तर मग पाहूया कोणते पदार्थ दारूसोबत खाऊ नयेत.

तेलकट किंवा तळलेले पदार्थ

फ्रेंच फ्राईज, पकोडे, चिकन फ्राय किंवा चिकन कबाब यांसारखे तेलकट पदार्थ दारूसोबत खाणं टाळा. तळलेले पदार्थ आणि अल्कोहोल एकत्र पोटात गेल्यावर पोटाच्या आतल्या भागाला त्रास होतो. यामुळे अ‍ॅसिड रिफ्लेक्स, छातीत जळजळ आणि मळमळ यांसारख्या समस्या सुरू होतात.

जास्त मीठ असलेले पदार्थ

खारे शेंगदाणे, चिप्स किंवा इतर तळलेले खारट स्नॅक्स हे दारूसोबत खाण्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन मानलं जातं. पण हे चुकीचं आहे. दारूमुळे शरीरातील पाणी कमी होतं, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. अशावेळी खारट पदार्थ खाल्ल्यास शरीरातील सोडिअमची पातळी वाढते आणि हाय ब्लड प्रेशरचा (बीपी) धोका निर्माण होतो.

दुग्धजन्य पदार्थ (डेअरी प्रोडक्ट्स)

चीज, पनीर किंवा बटर वापरून बनवलेले पदार्थ दारूसोबत खाल्ल्यास पचनाच्या समस्या निर्माण होतात. यामुळे पोट फुगणे, गॅस होणे यांसारखे त्रास सुरू होतात. हे कॉम्बिनेशन भविष्यात आरोग्याच्या मोठ्या समस्यांना आमंत्रण देऊ शकतं.

गोड पदार्थ

अनेकांना वाटतं की दारूसोबत गोड पदार्थ खाल्ल्यास 'किक' जास्त बसते. पण खरं तर हे खूपच धोकादायक आहे. दारू आणि साखरेचं मिश्रण रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवतं. यामुळे लिव्हरवरचा ताण वाढतो. इतकंच नाही, तर यामुळे दुसऱ्या दिवशीचा हँगओव्हर खूप जास्त त्रासदायक ठरतो.

चॉकलेट

दारूसोबत किंवा दारू प्यायल्यानंतर चॉकलेट खाणं चांगलं नाही. चॉकलेटमध्ये असलेलं कॅफीन, कोको आणि फॅट्स पचनसंस्थेवर वाईट परिणाम करतात. यामुळे अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या वाढू शकतात.

विशेष सूचना: मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. आरोग्याची काळजी आणि संभाव्य धोक्यांबद्दल माहिती देण्यासाठी हा लेख आहे.