अचानक वजन कमी होतंय, विनाकारण चिडचिड होतेय किंवा रात्री झोप लागत नाहीये? याला फक्त ताणतणाव समजून दुर्लक्ष करू नका. ही छोटी वाटणारी लक्षणं शरीरात थायरॉईडसारखा गंभीर आजार बळावत असल्याचा इशारा असू शकतात.
मुंबई : थायरॉईड ही आपल्या गळ्याच्या भागात असलेली एक छोटीशी ग्रंथी आहे, पण तिचं काम खूप मोठं आहे. ही ग्रंथी शरीराचं मेटाबॉलिझम (चयापचय) नियंत्रित करते. जेव्हा ही ग्रंथी गरजेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करू लागते, तेव्हा त्याला 'हायपरथायरॉईडीझम' म्हणतात. आणि याच वेळी शरीरात अनेक विचित्र लक्षणं दिसू लागतात.
बरेच लोक या लक्षणांना कामाचा ताण किंवा वाढत्या वयाचा परिणाम समजून दुर्लक्ष करतात, ज्यामुळे आजार आणखी गुंतागुंतीचा होतो.
ही १० धोक्याची लक्षणं कधीच टाळू नका:
१. अचानक वजन कमी होणं: डायटिंग किंवा व्यायाम न करताही जर १-२ महिन्यांत ५-६ किलो वजन कमी झालं असेल, तर सावध व्हा. थायरॉईड हार्मोन्स वाढल्याने मेटाबॉलिझम वाढतं, ज्यामुळे शरीर वेगाने कॅलरीज जाळू लागतं.
२. सतत चिडचिड आणि अस्वस्थता: छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग येतोय, हात-पाय थरथरतायत, सतत नर्व्हस वाटतंय? हे थायरॉईडचं एक प्रमुख लक्षण आहे.
३. छातीत धडधड आणि वाढलेले ठोके: शांत बसलेलं असतानाही हृदयाचे ठोके खूप वेगाने पडतायत, छातीत धडधडतंय असं वाटणं. अनेकदा पल्स रेट १०० च्या वर जातो.
४. जास्त घाम येणं आणि उकडणं: एसी रूममध्येही घाम येतोय, थोड्याशा उष्णतेनेही त्रास होतोय? शरीरात हार्मोन्स वाढले की शरीर सतत गरम राहतं.
५. झोप न लागणं: दिवसभर थकवा जाणवतो, पण रात्री अंथरुणावर पडल्यावर झोप उडून जाते. डोकं सतत विचार करत राहतं.
६. वारंवार टॉयलेटला जावं लागणं: पचनक्रिया खूप वेगवान होते, त्यामुळे दिवसातून अनेकदा टॉयलेटला जावं लागतं.
७. केस गळणं आणि त्वचा पातळ होणं: खूप जास्त केस गळणं, त्वचा प्रमाणापेक्षा जास्त गुळगुळीत आणि पातळ होणं, नखं लवकर तुटणं.
८. डोळे बाहेर आल्यासारखे वाटणं: हायपरथायरॉईडीझमचं एक खास लक्षण म्हणजे डोळे मोठे आणि बाहेर आल्यासारखे दिसणं, तसेच दृष्टी अंधुक होणं.
९. स्नायूंमध्ये अशक्तपणा आणि थरथर: जिने चढताना त्रास होणं, हाताने काही धरताना हात थरथरणं.
१०. महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी: पाळीचा रक्तस्राव कमी होणं, पाळी अनियमित होणं किंवा पूर्णपणे बंद होणं.
डॉक्टरांकडे कधी जावं?
वरीलपैकी ३ पेक्षा जास्त लक्षणं जर तुमच्यात दिसत असतील आणि ती २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून असतील, तर अजिबात उशीर करू नका. लगेच एका एंडोक्रायनोलॉजिस्टचा (Endocrinologist) सल्ला घ्या आणि T3, T4, TSH या टेस्ट करून घ्या. सुरुवातीच्या टप्प्यातच निदान झालं, तर औषधांनी थायरॉईड नियंत्रणात ठेवता येतो.






