वर्षा नावाच्या एका तरुणीने झोमॅटोमधील ५० हजार रुपये महिन्याची नोकरी सोडली आणि स्वतःचा नवा मार्ग निवडला. आता तिने सप्टेंबर महिन्यात तब्बल २.२८ लाख रुपयांची कमाई केली आहे.

मध्यमवर्गीय लोकांसाठी आपली सुरक्षित नोकरी सोडणं हा कधीच सोपा निर्णय नसतो. पण वर्षा नावाच्या एका तरुणीने हे धाडस दाखवलं. पाच महिन्यांपूर्वी तिने झोमॅटोमधील आपली नोकरी सोडली. आता तिने उत्पन्नाचे चार वेगवेगळे मार्ग शोधले आहेत. सप्टेंबर महिन्यात तिने तब्बल २.२८ लाख रुपयांची कमाई केली आहे. तिची ही प्रेरणादायी गोष्ट नक्की वाचा.

वर्षाने नेमकं काय सांगितलं?

वर्षाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने सांगितलंय की, ती झोमॅटोमध्ये महिन्याला ५० हजार रुपये कमवायची. पण तिने ती नोकरी सोडली. आता ती टेक्नॉलॉजीशी संबंधित कंटेंट बनवते, ब्रँड्ससोबत काम करते आणि इतरांनाही हे कसं करायचं ते शिकवते. "पाच महिन्यांपूर्वी मी झोमॅटोमधील माझी एकदम भारी नोकरी सोडली. ५० हजारांची नोकरी सोडून मी उत्पन्नाचे चार नवे मार्ग कसे शोधले आणि सप्टेंबरमध्ये किती कमाई केली, हे मी तुम्हाला सांगणार आहे," असं वर्षाने या व्हिडिओत म्हटलंय.

एकाच गोष्टीतून १ लाखापेक्षा जास्त कमाई!

सप्टेंबर महिन्यात वर्षाला सर्वात जास्त पैसा 'टेक युजीसी' (TechUGC - टेक्नॉलॉजी युझर-जनरेटेड कंटेंट) मधून मिळाला. या कामातून तिने १,००,९०० रुपये कमावले. विशेष म्हणजे, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ही कमाई थोडी कमीच असल्याचं तिने सांगितलं.

टेक युजीसी म्हणजे नेमकं काय?

टेक युजीसीमध्ये ॲप्स, सॉफ्टवेअर आणि डिजिटल टूल्स यांसारख्या टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्सबद्दल माहिती देणारे व्हिडिओ बनवले जातात. यात एखादं ॲप कसं वापरायचं, त्याचे फायदे काय आहेत, हे सांगणारे ट्युटोरियल्स आणि डेमो व्हिडिओ असतात.

ब्रँड पार्टनरशिपमधून मिळाले ८६,००० रुपये

तिच्या कमाईचा दुसरा मोठा मार्ग म्हणजे सोशल मीडियावरील ब्रँड पार्टनरशिप. यातून तिने ८६,००० रुपये कमावले. पण यातले काही पैसे अजून तिच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. याबद्दल बोलताना वर्षा म्हणाली, "माझ्या पेजवर येणाऱ्या ब्रँड पार्टनरशिपमधून मला ८६,००० रुपये मिळाले. पण यातले ६६,००० रुपये अजून माझ्या बँकेत आलेले नाहीत."

क्लासेसमधूनही होतेय बक्कळ कमाई!

टेक युजीसीच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे, हे वर्षा लोकांना शिकवते. यातूनही तिची चांगली कमाई होते. सप्टेंबर महिन्यात तिने या क्लासेसमधून ३६,२४२ रुपये कमावले. "टेक युजीसी वापरून लाखोंची कमाई कशी करायची, याचे मी क्लासेस घेते. यातून मला ३६,२४२ रुपये मिळाले," असं तिने स्वतः स्पष्ट केलं आहे.