जगभरात इंधनाच्या दरात मोठी तफावत असून व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल केवळ २.२५ रुपये प्रति लिटरने मिळते. याउलट, हॉंगकॉंगमध्ये दर ३९४ रुपयांवर पोहोचले आहेत. भारतात सध्या दर स्थिर असले तरी, जागतिक तणावामुळे भविष्यात दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही.

जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठे चढ-उतार सुरू असताना अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र काही देश अजूनही नागरिकांना अत्यंत कमी दरात इंधन पुरवत आहेत. एका देशात डिझेल अवघ्या 39 पैशांना तर पेट्रोल केवळ 2.25 रुपये प्रति लिटर दराने मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोणत्या देशात मिळतं सर्वात स्वस्त इंधन? 

व्हेनेझुएला हा जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल विकणारा देश मानला जातो. तेलसाठ्यांनी समृद्ध असलेल्या या देशात सरकारकडून इंधनावर मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. त्यामुळे तेथील नागरिकांना अत्यंत कमी किमतीत पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होते. काही अहवालांनुसार येथे पेट्रोलचा दर भारतीय चलनात फक्त 2.25 रुपये प्रति लिटर इतका आहे.

सर्वात महाग पेट्रोल कुठे? 

दुसरीकडे, काही युरोपीय देशांमध्ये पेट्रोलचे दर अत्यंत महाग आहेत. विशेषतः हॉंगकॉंगसारख्या भागात पेट्रोलचा दर तब्बल 394 रुपयांहून अधिक प्रति लिटर असल्याचे सांगितले जात आहे. करांचा मोठा बोजा, आयात खर्च आणि जागतिक तणाव यामुळे या देशांमध्ये इंधन महाग झाले आहे.

भारतात काय आहे परिस्थिती? 

भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल-डिझेलचे दर तुलनेने स्थिर ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारने दरवाढीबाबतच्या अफवा फेटाळून लावत सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही जागतिक बाजारातील परिस्थिती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे भविष्यात दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक तेल बाजार अस्थिर झाला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे पुरवठा साखळीवर परिणाम होत असून अनेक देशांमध्ये इंधन दरात वाढ झाली आहे. काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल 68 टक्क्यांपर्यंत महाग झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार? 

भारतात सध्या दर स्थिर असले तरी आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम भविष्यात दिसू शकतो. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाचे दर आणखी वाढल्यास वाहतूक, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे लक्ष आता पेट्रोल-डिझेलच्या दरांकडे लागले आहे.