पश्चिम बंगालमधील एका व्यावसायिकाने आपल्या नववीत शिकणाऱ्या मुलाला परीक्षेत चांगल्या कामगिरीबद्दल २.३० कोटी रुपयांची BMW M4 Competition गिफ्ट केली आहे. हे महागडे गिफ्ट सध्या स्थानिक परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.
नववीच्या सहामाही परीक्षेत चांगल्या कामगिरीबद्दल एका मुलाला त्याच्या वडिलांकडून एक अतिशय महागडे गिफ्ट मिळाले आहे. ही एक लग्झरी BMW M4 Competition कार आहे आणि तिची किंमत सुमारे २.३० कोटी रुपये आहे. हे अनोखं बक्षीस सध्या पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गलसीच्या परज परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.
मोहम्मद तल्हा हा अल्पवयीन मुलगा असून त्याचे वडील शमशुद्दीन मिद्या हे व्यावसायिक आहेत. ते पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गलसी येथे राहतात. मुलाच्या अभ्यासातील कामगिरीवर खूश होऊन शमशुद्दीन यांनी मुलाची लग्झरी स्पोर्ट्स कार घेण्याची जुनी इच्छा पूर्ण केली. त्यांच्या माहितीनुसार, तल्हा खूप दिवसांपासून BMW M4 Competition खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करत होता. नववीच्या सहामाही परीक्षेत मिळवलेल्या त्याच्या उत्तम यशानंतर वडिलांनी त्याचे हे स्वप्न सत्यात उतरवण्याचा निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, शमशुद्दीन आपल्या मुलाच्या आवडीची गाडी खरेदी करण्यासाठी मुंबईला गेले होते. आता सुमारे २.३० कोटी रुपये किंमतीची ही BMW M4 Competition पूर्व वर्धमानमध्ये दाखल झाल्यामुळे स्थानिकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले आहे.
शमशुद्दीन हे त्यांच्या व्यावसायिक आवडीसाठी आणि महागड्या गाड्यांच्या शोकासाठी परिसरात चांगलेच ओळखले जातात. रेंज रोव्हर, व्हॉल्वो, महिंद्रा थार आणि ह्युंदाई अल्काजार यांसारख्या लग्झरी कार त्यांच्या ताफ्यात आहेत. यातच आता नुकतीच खरेदी केलेली BMW M4 Competition ही नवी भर पडली आहे.
विशेष म्हणजे गाड्यांच्या नंबर प्लेट्सचीही त्यांना मोठी आवड आहे. त्यांच्याकडे अनेक अशा गाड्या आहेत ज्यांचे रजिस्ट्रेशन नंबर "555" या अंकाने संपतात. हा नंबर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या गाड्यांशीही जोडलेला आहे. एवढं महागडं गिफ्ट देणं शक्य झाल्याबद्दल शमशुद्दीन यांनी देवाचे आभार मानले आहेत. त्यांचा मुलगा अभ्यासात खूप हुशार आहे आणि तो गेल्या अनेक दिवसांपासून या BMW साठी त्यांच्याकडे हट्ट करत होता, असं त्यांनी सांगितलं.
इतकं महागडं गिफ्ट मिळाल्याने तल्हा साहजिकच खूप आनंदी आहे, पण तूर्तास स्वतः कार चालवण्याचा त्याचा कोणताही विचार नाही. तो अजूनही अल्पवयीन आहे आणि त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याने त्याचे वडील ही कार चालवणार आहेत. सध्या आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार असून, आठवड्यातून एकदा वडिलांच्या शेजारी बसून या नव्या BMW मधून राईड घेणार असल्याचं तल्हाने सांगितलं.














