टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीच्या फिटनेसचं रहस्य त्याच्या खास सुपरफूड सॅलडमध्ये दडलंय. क्विनोआ, कलिंगड आणि भाज्यांपासून बनणारं हे सॅलड बनवायला सोपं आणि आरोग्यासाठी एकदम भारी आहे. फायबर आणि प्रोटीनने भरपूर असलेलं हे सॅलड फिटनेस टिकवून ठेवायला खूप मदत करतं.
टीम इंडियामध्ये फिटनेस म्हटलं की एकच नाव डोळ्यांसमोर येतं, ते म्हणजे विराट कोहली. फिटनेसच्या बाबतीत आजही विराटला कोणीच टक्कर देऊ शकत नाही. तो स्वतःच्या शरीराची जेवढी काळजी घेतो, तेवढीच मेहनतही घेतो. वर्कआउटसोबतच विराट डायटमध्ये नेमकं काय घेतो, हा प्रश्न सर्वांनाच पडतो.
तुम्हाला माहितीये का? विराटला एक खास सुपरफूड सॅलड खूप आवडतं. त्याच्या उत्तम आरोग्याचं रहस्य याच सॅलडमध्ये दडलंय. 'Curly Tales' ला दिलेल्या एका मुलाखतीत विराटने स्वतः या सुपर सॅलडबद्दल सांगितलं होतं. बॅलन्स्ड डायट आणि फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी हे सॅलड खूप फायदेशीर ठरतं.
सुपर सॅलडसाठी लागणारे साहित्य
- रॉकेट पाने (Rocket leaves), मिक्स हिरव्या भाज्या
- क्विनोआ (Quinoa)
- ढोबळी मिरची (Bell pepper)
- कलिंगड
- काजू
- ऑलिव्ह ऑईल
- व्हिनेगर
- मध
- हिरवी मिरची
- मोहरीचा सॉस (Mustard sauce)
- मीठ
सॅलड कसं बनवायचं?
- हे सॅलड बनवणं एकदम सोपं आहे. यासाठी जास्त वेळ गॅसवर स्वयंपाक करण्याची गरज नाही. रोजच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
- सुरुवातीला क्विनोआ पाण्यात चांगला उकडून घ्या.
- ढोबळी मिरची थोडी ठेचून किंवा भाजून घ्या.
- कलिंगडाचे छोटे तुकडे करून घ्या.
- ड्रेसिंगसाठी एका वाटीत २ चमचे ऑलिव्ह ऑईल, एक चमचा व्हिनेगर, थोडं मध, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मोहरीचा सॉस घ्या.
- आता हे सगळं एका मोठ्या बाऊलमध्ये एकत्र करा आणि चांगलं मिक्स करा.
- वरती काजूचे तुकडे टाकून गार्निश करा आणि ताजं ताजं सॅलड खाण्यासाठी तयार आहे.
हे सॅलड कसं काम करतं?
या सॅलडमध्ये फायबर, हेल्दी फॅट्स, प्लांट प्रोटीन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरावर याचा खूप चांगला परिणाम होतो. जे लोक हलका आहार घेतात किंवा वर्कआउटनंतर पौष्टिक जेवणाच्या शोधात असतात, त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे.
आरोग्य हीच संपत्ती
विराटने स्वतःच्या मुलाखतीत सांगितलंय की हे त्याचं सर्वात आवडतं फूड आहे. फक्त विराटच नाही, तर अनेक स्पोर्ट्स स्टार्स आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतात. 'आरोग्य हीच संपत्ती' असं म्हणतात ते उगीच नाही. जर तुमचा फिटनेस चांगला असेल, तर तुम्ही कोणतंही ध्येय सहज गाठू शकता. त्यामुळे शरीराला योग्य आहार देणं खूप गरजेचं आहे. तुम्हालाही विराटसारखं फिट राहायचं असेल, तर अशा हेल्दी डायटवर नक्की फोकस करा.
