इन्स्टाग्रामवर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला २७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यात एक भाजीवाला भावेश नावाच्या ग्राहकाकडून पैसे घेण्यास नकार देतो. भावेशच्या वडिलांसोबत या भाजीवाल्याची ३५ वर्षांची मैत्री होती. २०१३ मध्ये वडिलांचे निधन झाले, पण त्यांच्या मैत्रीची आठवण म्हणून तो भाजीवाला आजही भावेशकडून पैसे घेत नाही.
काही मैत्री इतकी घट्ट असते की मृत्यूही ती तोडू शकत नाही. एका भाजीवाल्याने ग्राहकाकडून पैसे घेण्यास नकार दिला. कारण तो ग्राहक फक्त ग्राहक नव्हता, तर त्याच्या ३५ जुन्या मित्राचा मुलगा होता. भावेश नावाच्या एका इन्स्टाग्राम युझरने हा भावुक करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत २७ मिलियनहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
या व्हिडिओत भावेशने त्या भाजीवाल्याची ओळख करून दिली आहे. भावेशने सांगितलं की, २०१३ मध्ये त्याच्या वडिलांचं निधन झालं. इतकी वर्षे उलटून गेली तरी हा भाजीवाला त्याच्याकडून भाजीचे पैसे घेत नाही. याचं कारण म्हणजे, भावेशच्या वडिलांसोबत त्याची ३५ वर्षांची मैत्री होती. तो आजही मित्राच्या घराला स्वतःचं घर मानतो. "अरे, घरातच तर चालली आहे भाजी. घरचे पैसे थोडेच असतात," असं तो भाजीवाला व्हिडिओत म्हणताना दिसतो. घरच्या माणसांकडून पैसे घेतले जात नाहीत, अशी त्याची भावना आहे.
भावेशच्या वडिलांबद्दल बोलताना भाजीवाल्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण त्याच्या डोळ्यांतील भावुकता लपून राहिली नाही. भावना अनावर होऊ नयेत म्हणून त्याने पटकन नजर दुसरीकडे वळवली. पैसे न घेण्यामागे फक्त भाजीचा विषय नव्हता, तर मित्राच्या मृत्यूनंतरही टिकून असलेल्या एका अतूट नात्याची ती पावती होती.
तिथून निघण्यापूर्वी भावेशने त्या भाजीवाल्याला प्रेमाने मिठी मारली. काळ आणि परिस्थिती बदलली असली तरी, त्यांच्यातील हे नातं किती घट्ट आहे, हे या एका मिठीतून स्पष्ट दिसत होतं.
पाहा व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर लोक या व्हिडिओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. मृत्यूनंतरही जिवलग मित्राच्या कुटुंबावर असा जीव लावणारी मैत्री खूप दुर्मिळ असते, अशी चर्चा युझर्स करत आहेत.
एका युझरने लिहिलंय की, भाजीवाला शब्दांतून भावना लपवण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याच्या डोळ्यांतून मैत्रीची खोली स्पष्ट दिसते. भावेश खूप नशीबवान आहे की त्याला अशी व्यक्ती मिळाली जी आजही त्याच्या घराला स्वतःचं घर मानते. अशी माणसं दुर्मिळ असतात आणि हे नातं अनमोल आहे, असंही या युझरने म्हटलं आहे.
दुसऱ्या एका युझरने म्हटलंय की, भाजीवाल्याच्या या प्रेमावरून भावेशचे वडील किती चांगल्या स्वभावाचे असतील याचा अंदाज येतो. मित्राच्या मृत्यूनंतरही इतकी वर्षे हे नातं जपणं, हे खऱ्या मैत्रीचं उत्तम उदाहरण आहे.






