द्वारका एक्सप्रेसवेवर एका व्यक्तीने चालत्या कारमधून फटाके फोडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या जीवघेण्या स्टंटमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

द्वारका एक्सप्रेसवेवर एका व्यक्तीने चालत्या कारमधून फटाके फोडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक रस्ते सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत. या घटनेची दखल घेत पोलिसांनी आता गाडी आणि त्यातील तरुणांचा शोध सुरू केला आहे.

गुरुवारी सकाळी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली. या व्हिडिओमध्ये एक पांढऱ्या रंगाची ह्युंदाई सेडान कार हायवेवरून वेगात जाताना दिसत आहे. कारमध्ये बसलेला एक तरुण खिडकीची काच खाली करतो आणि बंदुकीसारख्या दिसणाऱ्या एका गॅजेटमधून आकाशात सलग फटाके फोडताना दिसतो.

काळ्या काचा असलेल्या एका गाडीच्या शेजारून ही कार जात असताना हा तरुण चालत्या गाडीतून स्कायशॉट्स (फटाके) उडवताना दिसतोय. या धोकादायक स्टंटमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता आणि इतर वाहनचालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

शेजारून जाणाऱ्या दुसऱ्या एका कारमधील प्रवाशांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, जो आता तुफान व्हायरल झाला आहे.

चालत्या कारमधून अशा प्रकारे फटाके फोडल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो आणि इतर वाहनचालकांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. वाहतुकीचे नियम आणि सार्वजनिक सुरक्षेला धाब्यावर बसवणाऱ्या या कृत्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट आहे.

पाहा व्हायरल व्हिडिओ

Scroll to load tweet…

या व्हायरल व्हिडिओची तपासणी करून गाडीचा नंबर आणि या तरुणांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तपासाअंती वाहतूक आणि सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.