अमेरिकेत एका सापाने चक्क तीन गोल्फ बॉल गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'साऊथ टेक्सास एव्हियन अँड एक्झॉटिक हॉस्पिटल'च्या डॉक्टरांनी सापाला भूल देऊन, कोणतीही शस्त्रक्रिया न करता हातानेच हे बॉल सुखरूप बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमेरिकेत एका सापाने चक्क एक-दोन नव्हे तर तब्बल तीन गोल्फ बॉल गिळले. यानंतर त्याला उपचारासाठी सॅन अँटोनियो येथील 'साऊथ टेक्सास एव्हियन अँड एक्झॉटिक हॉस्पिटल'मध्ये आणण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता अत्यंत शिताफीने हे बॉल बाहेर काढले. या अनोख्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ हॉस्पिटलने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सापाला आधी भूल देण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक सापाच्या शरीरातील गोल्फ बॉल हळूहळू त्याच्या तोंडाच्या दिशेने ढकलले. जसा बॉल तोंडाजवळ यायचा, साप तोंड उघडायचा आणि डॉक्टर अलगद तो बॉल बाहेर काढायचे.
यानंतर व्हिडिओमध्ये सापाचे शरीर जवळून दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये आणखी दोन गोल्फ बॉल आत अडकल्याचे स्पष्ट दिसते. सापाने एवढे मोठे बॉल कसे गिळले, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. सुदैवाने, या सापावर कोणतीही शस्त्रक्रिया करावी लागली नाही. सापाला भूल दिलेली असतानाच डॉक्टरांनी हातानेच तिन्ही बॉल सुरक्षितपणे बाहेर काढले.
हॉस्पिटलने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "ही नक्कीच आमच्यासाठी एक संस्मरणीय केस होती!" तसेच, अशा विदेशी प्राण्यांवर उपचार करताना अनेकदा अशा विचित्र केसेस समोर येतात, असेही त्यांनी सांगितले.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरीही चक्रावून गेले आहेत. सापाला हे गोल्फ बॉल म्हणजे खाद्य कसे वाटले, असा प्रश्न अनेकांना पडला. काहींनी मजेत म्हटले की, सापाला ते अंड्यांसारखे वाटले असावेत. तर काहींनी सापाबद्दल सहानुभूती व्यक्त करत, या सगळ्यानंतर तो आता बरा असेल अशी आशा व्यक्त केली.
