आंध्र प्रदेशमध्ये 'ट्रामाडोल' (Tramadol) या इंजेक्शनचा गैरवापर वाढल्याने राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. केवळ वैद्यकीय कारणांसाठी वापरले जाणारे हे इंजेक्शन बेकायदेशीरपणे विकले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सरकारने धडक कारवाई सुरू केली आहे.

मंत्र्यांच्या आदेशानंतर राज्यभरात तपासणी

राज्याचे आरोग्य मंत्री सत्यकुमार यादव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार, औषध नियंत्रण प्रशासन विभागाचे महासंचालक अरुण बाबू यांच्या देखरेखीखाली राज्यभरात तपासणी मोहीम राबवण्यात आली. अधिकाऱ्यांनी ट्रामाडोल आणि इतर कडक निर्बंध असलेल्या औषधांची खरेदी, साठा आणि विक्रीच्या रेकॉर्डची कसून तपासणी केली. या छाप्यातून समोर आलेल्या माहितीचा सविस्तर अहवाल अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिला आहे. नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची प्रक्रियाही विभागाने सुरू केली आहे.

जंगारेड्डीगुडेमच्या घटनेतून उघडकीस आला गैरप्रकार

राज्यभरात सुरू असलेल्या या तपासणीला जंगारेड्डीगुडेम भागात घडलेली एक घटना कारणीभूत ठरली. जीलुगुमिल्ली गावातील एका पामतेलाच्या बागेत मोठ्या प्रमाणात रिकाम्या इंजेक्शनच्या बाटल्या, फुटलेल्या कुप्या आणि वापरलेले सिरिंज सापडले. ड्रग इन्स्पेक्टर पी. मल्लिकार्जुन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, हे सर्व 'ट्रामाडेक्स' आणि 'ट्रामेक' या नावाने विकल्या जाणाऱ्या ट्रामाडोल इंजेक्शनचे अवशेष असल्याचे निष्पन्न झाले.

वैद्यकीय क्षेत्रात तीव्र वेदना कमी करण्यासाठी ट्रामाडोलचा वापर केला जातो. पण, याच्या वापरामुळे गुंगी येत असल्याने ते केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे बंधनकारक आहे. काही लोक नशेसाठी या औषधाचा गैरवापर करत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. योग्य प्रिस्क्रिप्शन, बिले आणि रेकॉर्डशिवाय या औषधांची विक्री करणे हा मोठा गुन्हा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हजारो इंजेक्शन्सचा साठा... 7,550 जप्त

जंगारेड्डीगुडेमच्या घटनेनंतर, अधिकाऱ्यांनी ट्रामाडोल उत्पादक कंपन्यांकडून आंध्र प्रदेश आणि तेलंगणात झालेल्या पुरवठ्याची माहिती गोळा केली. या तपासात जंगारेड्डीगुडेम परिसरातील काही मेडिकल एजन्सींनी मोठ्या प्रमाणात ट्रामाडोल इंजेक्शन्स खरेदी केल्याचे उघड झाले. यानंतर 'श्री लक्ष्मी श्रीनिवास मेडिकल एजन्सी' आणि 'डी. रूपा पेड्डींटी मेडिकल एजन्सी'वर छापे टाकण्यात आले.

श्री लक्ष्मी श्रीनिवास मेडिकल एजन्सीने यावर्षी दोन बिलांवर तब्बल 20 हजार ट्रामाडोल इंजेक्शन्स खरेदी केल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. पण, त्यांच्या विक्रीची बिले आणि साठ्याची कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही. चौकशीदरम्यान, त्यांनी ट्रामाडेक्स इंजेक्शनचे चार बॉक्स एका मित्राच्या सुतारकामाच्या दुकानात लपवून ठेवल्याचे समोर आले. तिथे छापा टाकला असता 7,550 इंजेक्शन्स सापडली, जी अधिकाऱ्यांनी जप्त केली. ही इंजेक्शन्स जंगारेड्डीगुडेम, मद्यानपु वरीगुडेम, वेगावरम आणि कुक्कुनूर यांसारख्या भागात पुरवली गेल्याचे तपासात उघड झाले.

बनावट बिलांचा खेळ... पाच जणांना अटक

दुसऱ्या एका मेडिकल एजन्सीच्या तपासणीतही संशयास्पद व्यवहार उघडकीस आले. डी. रूपा पेड्डींटी मेडिकल एजन्सीने गेल्या दोन वर्षांत 5,200 ट्रामेक इंजेक्शन्स खरेदी केल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. यापैकी 3,930 इंजेक्शन्स तेलंगणातील एका मेडिकल दुकानाला विकल्याचे रेकॉर्डवर दाखवण्यात आले होते. पण, तेलंगणाच्या औषध नियंत्रण अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, हा व्यवहार पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले.

प्रत्यक्षात ही औषधे इतर दुकानांना पुरवली जात होती आणि त्या बदल्यात बनावट बिले तयार केली जात होती. याप्रकरणी औषध नियंत्रण विभागाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर जंगारेड्डीगुडेम पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मेडिकल दुकानांचे मालक आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

परवाने रद्द करण्याची कारवाई... पाळत आणखी कडक

जंगारेड्डीगुडेमच्या घटनेसह राज्यातील इतर भागात तपासणीदरम्यान आढळलेल्या उल्लंघनांवर औषध नियंत्रण विभाग आता कठोर कारवाईच्या तयारीत आहे. मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या औषध दुकानांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. ट्रामाडोलसारख्या नियंत्रित औषधांचा बेकायदेशीर साठा करणे, रेकॉर्डशिवाय वाहतूक करणे किंवा बिलांशिवाय विक्री करणे यांसारख्या कृत्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

पोलीस आणि इतर यंत्रणांच्या मदतीने हा तपास पुढेही सुरू राहील, अशी माहिती औषध नियंत्रण प्रशासन विभागाचे महासंचालक अरुण बाबू यांनी दिली. औषधांची खरेदी, साठा आणि विक्रीच्या रेकॉर्डची कसून तपासणी केल्यानंतरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रामाडोलचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यभरात पाळत आणखी कडक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.