तेलंगणातील ५१ वर्षीय पास्टर बी. रवी जोसेफ यांनी सलग तीन वर्षे १० रुपयांची नाणी साठवली. नाणी बंद होणार असल्याच्या अफवा आणि कुटुंबीयांचा विरोध असतानाही त्यांनी तब्बल १.२३ लाख रुपये जमा केले. याच नाण्यांच्या मदतीने त्यांनी नवी कोरी होंडा अॅक्टिव्हा खरेदी केली आहे.
मुंबई : तेलंगाणाच्य मंचिर्याल जिल्ह्यातील लक्सेटिपेटमध्ये राहणाऱ्या ५१ वर्षीय बी. रवी जोसेफ यांनी जिद्दीने पैसे साठवून आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षांत १० रुपयांची नाणी साठवून तब्बल १.२३ लाख रुपयांची नवी होंडा अॅक्टिव्हा खरेदी केली आहे. जोसेफ हे एका चर्चमध्ये पास्टर आहेत. त्यांनी १० ऑक्टोबर २०२३ रोजी ही नाणी साठवायला सुरुवात केली होती. बाजारातून काहीही विकत घेतल्यावर उरलेले १० रुपयांचे नाणे ते बाजूला काढून ठेवायचे.
"गेली तीन वर्षे मी जेव्हा जेव्हा किराणा दुकानात किंवा बाहेर जायचो, तेव्हा थोडे थोडे पैसे साठवत गेलो. या काळात मी जवळपास १ लाख २३ हजार रुपये जमा केले," असं जोसेफ यांनी सांगितलं.
पुरेसे पैसे नसल्यामुळे आपल्याला 'रॉयल एनफिल्ड बुलेट' घेता आली नाही, याची खंतही जोसेफ यांनी बोलून दाखवली. १० ऑक्टोबर २०२३ पासून आपण ही नाणी गोळा करायला सुरुवात केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सुरुवातीला या पैशातून घरासाठी एखादी उपयोगी वस्तू घेण्याचा त्यांचा विचार होता. पण शेवटी त्यांनी दुचाकी घेण्याचा निर्णय पक्का केला.
त्यांचा हा पैसे साठवण्याचा प्रवास सोपा नव्हता. बाजारात १० रुपयांची नाणी बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनीही त्यांना नाणी साठवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता.
"माझ्या घरच्यांनी मला हे सगळं थांबवायला सांगितलं होतं, पण मी हार मानली नाही. मी प्रत्येक खरेदीनंतर उरलेली नाणी साठवत राहिलो," असं जोसेफ म्हणाले. जेव्हा ते ही सगळी नाणी घेऊन शोरूममध्ये पोहोचले, तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांना ती मोजण्यासाठी तब्बल दोन तास लागले. त्यानंतर ती रक्कम १.२३ लाख रुपये असल्याची खात्री झाली.
लक्सेटिपेटमधील जगदंबा होंडा मोटर्स या शोरूममधून त्यांनी ही गाडी खरेदी केली. गाडीची डिलिव्हरी घेताना जोसेफ यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. नाण्यांच्या स्वरूपात केलेल्या या अनोख्या पेमेंटची चर्चा आता संपूर्ण शहरात आणि शोरूममध्ये होत आहे. रोजच्या व्यवहारातील सुट्टे पैसे साठवून स्वतःची नवी दुचाकी घेण्याचं त्यांचं स्वप्न या तीन वर्षांच्या मेहनतीमुळे अखेर पूर्ण झालं आहे.


