रोज ₹७,५०० कमवणाऱ्या एका छोट्या चहावाल्याने कॅफे का सुरू करत नाही, यामागचं दिलेलं कारण सध्या चर्चेत आलं आहे. कमी खर्चात जास्त नफा मिळवण्याची त्याची ही बिझनेस स्ट्रॅटेजी नेटिझन्सना भलतीच भावली आहे.
बेंगळुरू(२३ नोव्हेंबर): चहाच्या टपरीवर झालेली एक साधी चर्चा सध्या खूपच लक्ष वेधून घेत आहे. एका महिलेने चहाच्या स्टॉलच्या मालकाला त्याच्या बिझनेस आणि भविष्यातील प्लॅन्सबद्दल विचारलं, तेव्हा रोज ₹७,५०० कमवणाऱ्या या चहावाल्याने मोठा कॅफे सुरू करण्याऐवजी छोटी टपरी चालवणंच का पसंत करतो, हे स्पष्ट केलं.
स्पृहा जोशी (@sprahajoshi) या एक्स युजरने ही पोस्ट शेअर केली आहे. ऑफिस एरियाच्या बाहेर असलेल्या एका छोट्या चहाच्या टपरीवर त्या थांबल्या असताना तिथे झालेल्या संवादाबद्दल त्यांनी सांगितलं. "आज ऑफिस एरियाबाहेर असलेल्या एका छोट्या टपरीवर मी थांबले होते. चहा पिता पिता मी त्या मालकाला सहज विचारलं की, तू दिवसाला किती कमवतोस?" असं स्पृहा जोशी यांनी लिहिलं आहे.
रोज ५०० कप चहाची विक्री!
त्यावेळी चहावाल्याने सांगितलं की, तो रोज जवळपास ५०० कप चहा विकतो. एका कपची किंमत ₹१५ आहे, त्यामुळे फक्त चहा विकूनच त्याला रोजचे ₹७,५०० मिळतात. एवढंच नाही तर, त्याच्या टपरीवर बिस्किटं, सँडविच आणि मॅगीही विकली जाते.
"फक्त चहातूनच रोज ₹७,५०० चं उत्पन्न मिळतं. त्यासोबतच तो बिस्किटं, सँडविच आणि मॅगीही विकतो," असं स्पृहा यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारीच त्याचे मुख्य ग्राहक आहेत. कामाच्या मधल्या वेळेत चहा पिण्यासाठी किंवा पटकन काहीतरी खाण्यासाठी ही जागा त्यांना एकदम सोयीची वाटते. पण, एवढे ग्राहक असूनही या चहावाल्याला मोठा कॅफे सुरू करावासा वाटत नाही का, असा प्रश्न स्पृहा यांना पडला.
कॅफे न उघडण्यामागे चहावाल्याने काय दिलं कारण?
एवढा चांगला बिझनेस होत असताना मोठा कॅफे सुरू करण्यात का रस नाही, असं जेव्हा स्पृहा यांनी विचारलं, तेव्हा चहावाल्याने दिलेलं उत्तर त्याची बिझनेस स्ट्रॅटेजी सांगणारं होतं. "येथे ग्राहक रोज येतात. कॅफे सुरू केला तर भाडं आणि इतर खर्चही वाढतील," असं तो म्हणाला.
मोठा कॅफे चालवण्यासाठी मोठी जागा, फर्निचर, इंटिरिअर डिझाइन आणि जास्तीच्या स्टाफची गरज असते. शिवाय भाडं, वीज बिल आणि मेंटेनन्सचा खर्चही सतत सुरूच राहतो. बिझनेसमधून पैसे मिळायला सुरू होण्याआधीच हा खर्च वाढू शकतो.
त्या तुलनेत, छोटी चहाची टपरी अगदी कमी खर्चात चालवता येते. स्वस्तात चहा किंवा स्नॅक्स हवे असलेल्या ग्राहकांना बसायला मोठी जागा किंवा मोठं मेन्यू कार्ड लागतंच असं नाही. स्पृहा जोशी यांनी पोस्टच्या शेवटी लिहिलं आहे की, "कधी कधी बिझनेसचे मोठे निर्णय अशा लोकांकडून येतात, ज्यांनी कधी बिझनेसचं शिक्षणही घेतलेलं नसतं." छोटे व्यवसाय लोकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर असू शकतात का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
चहावाल्याच्या बिझनेस फॉर्म्युलावर नेटकऱ्यांची चर्चा
या संवादानंतर, छोटे व्यवसाय कधी कधी मोठ्या कंपन्यांपेक्षा कसे जास्त फायदेशीर ठरू शकतात, यावर चर्चा सुरू झाली आहे. एका युजरने म्हटलं आहे की, चहावाल्याने बरोबर अशी जागा निवडली आहे, जिथे त्याचे ग्राहक सहज पोहोचू शकतील.
"कॅफे वाले ग्राहक यावेत म्हणून भाडं देतात. पण या व्यक्तीने आधीपासूनच तिथे आपली टपरी लावली आहे, जिथे रोज ५०० कॉर्पोरेट कर्मचारी ब्रेकसाठी येतात," अशी कमेंट एका युजरने केली आहे.
या घटनेवरून हेच दिसून येतं की, छोट्या व्यवसायात ग्राहकांची रोजची गरज, योग्य जागा आणि कमी खर्च या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात.
















