क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर मिळणाऱ्या सामानांच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. स्विगी इन्स्टामार्टवरून मागवलेल्या अंड्यांच्या ट्रेमध्ये चक्क कुजलेली अंडी निघाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मुंबई : क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर मिळणाऱ्या सामानांच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. स्विगी इन्स्टामार्टवरून (Swiggy Instamart) मागवलेल्या अंड्यांच्या ट्रेमध्ये चक्क कुजलेली अंडी निघाल्याचा आरोप करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. सुशांत सिन्हा यांनी ३० सप्टेंबर रोजी एक्स (X) वर याबद्दलची पोस्ट शेअर केलीये.

"क्या ही ज़िंदगी जी रहे हैं हम?" असं लिहित त्यांनी या पोस्टची सुरुवात केलीये. सोबतच त्यांनी घरी आलेल्या अंड्यांचे फोटो आणि व्हिडीओही शेअर केलेत. ट्रेमधली एक-दोन नाही, तर बहुतांश अंडी खराब असल्याचा आरोप त्यांनी केलाय. "मी स्विगी इन्स्टामार्टवरून Dr Hen कंपनीचा अंड्यांचा ट्रे ऑर्डर केला होता. पण अंड्यांच्या नावावर काय आलंय ते बघा. एक नाही, तर जवळपास प्रत्येक अंडं असंच खराब होतं," असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

टॅक्स आणि इतर अतिरिक्त चार्जेस देऊनही ग्राहकांना चांगल्या दर्जाचं अन्न मिळत नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केलाय. अशा खराब दर्जाच्या अन्नामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलीये.

पोस्टवर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

सुशांत सिन्हा यांची ही पोस्ट एक्सवर वाऱ्यासारखी पसरलीये. यावर हजारो लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. काहींनी या अंड्यांच्या अवस्थेवर चिंता व्यक्त केलीये, तर काहींनी ऑनलाइन अंडी आणि किराणा सामान मागवताना त्यांनाही असाच अनुभव आल्याचं सांगितलंय. एका युजरने आपला अनुभव सांगताना म्हटलंय की, त्यांनी Amazon Now वरून Dr Hen ची अंडी मागवली होती, तेव्हा तीही अशीच खराब निघाली होती. चांगल्या दर्जाच्या सामानासाठी पैसे मोजणाऱ्या ग्राहकांना असं सामान मिळणं अत्यंत चुकीचं असल्याचं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय.

दुसऱ्या एका युजरने स्विगीवर नाराजी व्यक्त करत, अशा अनुभवानंतर आपण स्विगी वापरणंच सोडून दिल्याचं कमेंटमध्ये म्हटलंय. आणखी एकाने म्हटलंय की, १० मिनिटांत सामान पोहोचवणाऱ्या या क्विक कॉमर्स अ‍ॅप्सनी अन्नाच्या दर्जाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. ज्या ग्राहकांना आपला आवाज मोठ्या प्लॅटफॉर्मवर मांडता येत नाही, त्यांनाही अशाच समस्यांचा सामना करावा लागत असेल, असं मत त्यांनी मांडलंय.

आणखी एका युजरने असा सल्ला दिलाय की, क्विक कॉमर्स अ‍ॅप्सवरून अंडी मागवण्यापेक्षा ती जवळच्या दुकानातून घेणं कधीही चांगलं. सध्या सुशांत सिन्हा यांच्या या पोस्टमुळे स्विगी इन्स्टामार्टवरून डिलिव्हर होणाऱ्या सामानाच्या दर्जावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आता या आरोपांवर संबंधित कंपन्या काय अधिकृत प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.