पाटणाहून लखनौला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या पुढच्या भागाचे (नोज कोन) १७,००० फुटांवर अचानक नुकसान झाले. हवेत हा धक्का बसूनही विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. सर्व १०४ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स सुखरूप आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी विमान सध्या ग्राउंड करण्यात आले आहे.

पाटणा : पाटणाहून लखनौला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या पुढच्या भागाचे (फ्युजलेज) नुकसान झाल्याचे समोर आले आहे. हे विमान १७,००० फुटांवर असताना गारा, बर्फाचा तुकडा किंवा वीज पडल्यामुळे हे नुकसान झाले असावे, असा अंदाज आहे. सध्या तरी या मागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

या घटनेनंतर, दुपारी ४:०५ च्या सुमारास इंडिगोचे 6E925 हे विमान लखनौ विमानतळावर पोहोचले. या विमानात १०४ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. सुदैवाने सर्वजण सुखरूप आहेत. तांत्रिक तपासणी पूर्ण करण्यासाठी हे विमान सध्या थांबवण्यात आले आहे.

विमानतळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याची कोणतीही गरज पडली नाही. विमानाने लखनौ विमानतळावर अगदी सामान्यपणे लँडिंग केले.

प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामानातून उड्डाण करत असताना विमानावर वीज पडली असावी, या शक्यतेचीही चौकशी केली जात आहे.

विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान लँड झाल्यानंतर विमानतळावरील टीमला हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर इंडिगोच्या टीमला याची माहिती देण्यात आली. सध्या या विमानाला "एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड" (AOG) म्हणून मार्क केले आहे. याचा अर्थ तांत्रिक तपासणी पूर्ण होईपर्यंत हे विमान उड्डाण करू शकणार नाही. तपासणी आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या नुकसानीचे नेमके कारण आणि तीव्रता समजू शकेल.

विमानाच्या पुढच्या भागाला (नोज) डेंट पडला आहे. हे विमान लखनौहून अहमदाबादला जाणार होते. पण विमान रद्द झाल्याची माहिती एअरलाइनने प्रवाशांना दिली. तसेच त्यांना दुसऱ्या विमानाचे तिकीट किंवा पूर्ण रिफंड घेण्याचा पर्यायही देण्यात आला.

प्राथमिक अहवालानुसार, विमान खाली येत असताना १७,००० फुटांवर काहीतरी अडचण आल्याचे पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) कळवले होते. यावेळी विमानाला एक मोठा धक्का बसल्याचेही सांगण्यात आले. काही क्रू मेंबर्सच्या मते विमानावर वीज पडली असावी, पण तज्ज्ञांना ही शक्यता फार कमी वाटते. एका तज्ज्ञाने सांगितले की, विमानाचा बाहेरील भाग वीज सहन करण्यासाठीच बनवलेला असतो. जर वीज पडलीच, तर ती विमानाच्या आत न शिरता बाहेरील भागावरून पंख किंवा शेपटीच्या माध्यमातून हवेत निघून जाते. विमान लँड झाल्यानंतर केलेल्या तपासणीत नोज कोनचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.

एव्हिएशन तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, वादळी ढगांमध्ये मोठ्या गारा किंवा बर्फाचे तुकडे लपलेले असू शकतात. विमानाचा वेग जास्त असताना हे तुकडे आदळल्यास रॅडोमचे (नोज कोन) सहज नुकसान होऊ शकते. याशिवाय एखाद्या पक्ष्याची धडक बसल्यानेही हे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. वीज पडणे हे देखील एक कारण असू शकते. पायलटने दिलेला अधिकृत अहवाल सध्या गोपनीय ठेवण्यात आला आहे, जेणेकरून DGCA कडून त्याचे योग्य पुनरावलोकन केले जाईल.