KGF सारख्या सोन्याच्या खाणी काही सगळीकडे नसतात. मग पृथ्वीवरचं सोनं आहे तरी कुठे? जर्मनीच्या वैज्ञानिकांनी केलेल्या एका अभ्यासात याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिपोर्टमुळे जगभरातील देशांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

नवी दिल्ली : सोनं दिवसेंदिवस महाग होत चाललंय आणि ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. भारतातील सोन्याच्या खाणींमध्ये आता पुरेसं सोनं मिळत नाहीये, त्यामुळे नवीन खाणींचा शोध सुरू आहे. अशातच, एका विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मते, पृथ्वीच्या पोटात सोनं आणि इतर मौल्यवान धातूंचा प्रचंड मोठा साठा आहे. हा रिपोर्ट प्रसिद्ध होताच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

९९.९९९ टक्के सोन्याचा साठा

जर्मनीच्या 'गोटिंगेन विद्यापीठा'च्या (University of Göttingen) शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आत दडलेल्या रहस्यांवर संशोधन केलं आहे. हा रिसर्च रिपोर्ट 'नेचर' (Nature) मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पृथ्वीच्या आत सोनं नक्की कुठे आहे, या प्रश्नाचं उत्तर या रिपोर्टमधून मिळतं. रिपोर्टनुसार, पृथ्वीवरचं तब्बल ९९.९९९ टक्के सोनं पृथ्वीच्या गाभ्यात आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३००० किलोमीटर खाली अत्यंत कठीण खडक आहेत. त्याच्याही खाली पृथ्वीचा धातूंनी बनलेला गाभा आहे. याच गाभ्यामध्ये हा प्रचंड साठा आहे. या संशोधनातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. आधी असं मानलं जायचं की, पृथ्वीच्या गाभ्यातील हे मौल्यवान धातू त्याच्या वरच्या 'मँटल' (mantle) थरापासून पूर्णपणे वेगळे आहेत. पण आता या नवीन संशोधनातून असं दिसतंय की, गाभ्यामधले काही धातू हळूहळू वरच्या मँटल थरात झिरपत आहेत.

ज्वालामुखीच्या अभ्यासातून सत्य समोर

हवाई बेटांवरील पर्वतांमधील ज्वालामुखींचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना ही गोष्ट समजली. त्यांना तिथे 'रुथेनियम आयसोटोप' (Ruthenium isotope) नावाचा एक घटक सापडला. रुथेनियम हा धातू पृथ्वीच्या पृष्ठभागापेक्षा तिच्या गाभ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वी तयार झाली, तेव्हा सोन्यासोबत अडकलेल्या रुथेनियममध्ये आणि उल्कापातांमधून पृथ्वीवर आलेल्या रुथेनियममध्ये थोडा फरक आहे. ज्वालामुखीच्या लाव्हारसातून बाहेर आलेल्या खडकांमध्ये सापडलेला रुथेनियम हा थेट पृथ्वीच्या गाभ्यातूनच वर आला आहे, हे या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

पृथ्वीच्या गाभ्यातून सोनं काढणं शक्य आहे का?

पृथ्वीच्या गाभ्यात सोनं आणि इतर धातूंचा प्रचंड साठा असला तरी, तो बाहेर काढणं जवळपास अशक्य आहे. हा साठा तब्बल ३००० किलोमीटरपेक्षा जास्त खोल आहे, जिथे प्रचंड तापमान आणि दाब आहे. इतक्या तापमानात खाणकाम करणारी कोणतीही टेक्नॉलॉजी आज उपलब्ध नाही. शिवाय, असं काही करण्याचा प्रयत्न केल्यास पृथ्वीवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे याला परवानगी मिळणंही शक्य नाही. ज्वालामुखीच्या उद्रेकातून अगदी थोड्या प्रमाणात सोनं बाहेर येतं, पण प्रचंड उष्णतेमुळे ते लाव्हारसात मिसळून जातं, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.