रेड बुलने त्यांच्या कॅफिनयुक्त पेयांवर 'एनर्जी ड्रिंक' नाव वापरण्यास बंदी घालणाऱ्या FSSAI च्या आदेशाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं आहे. कंपनीला कोणतीही नोटीस न देता कारवाई का केली, असा सवाल कोर्टाने विचारला आहे.

नवी दिल्ली : रेड बुलने त्यांच्या कॅफिनयुक्त पेयांसाठी 'एनर्जी ड्रिंक' हा शब्द वापरणं बंद करावं, असा आदेश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) दिला होता. या आदेशाविरोधात आता रेड बुलने थेट दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.

'एनर्जी ड्रिंक' लेबलवरील FSSAI च्या आदेशाला रेड बुलचं आव्हान

न्यायमूर्ती अमित महाजन यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. हा आदेश काढण्यापूर्वी तुम्ही रेड बुलला कारणे दाखवा नोटीस बजावली होती का? त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती का? अशी विचारणा कोर्टाने सुनावणीदरम्यान FSSAI ला केली. कंपनीचं म्हणणं ऐकून न घेताच इतक्या तातडीने कारवाई करण्याची काय गरज होती, असा सवालही कोर्टाने उपस्थित केला. तसेच या प्रकरणी योग्य ती माहिती घेण्याचे निर्देश FSSAI ला दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान, सोमवारच्या सुनावणीत कोर्टाने रेड बुलला कोणताही दिलासा (अंतरिम संरक्षण) दिलेला नाही.

नेमका वाद काय आहे?

FSSAI च्या सहाय्यक संचालकांनी ३० जून २०२६ रोजी एक आदेश काढला होता. यात रेड बुलला त्यांच्या कॅफिनयुक्त पेयांवरून 'एनर्जी ड्रिंक' हे नाव हटवण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला कंपनीने आव्हान दिलं आहे. याशिवाय, १७ जुलै रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवण्यात आलं होतं. ज्या उत्पादनांवर हे नियम पाळले जात नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यास यात सांगितलं होतं. रेड बुलने या पत्रालाही विरोध दर्शवला आहे.

कोणतीही पूर्वसूचना न दिल्याचा कंपनीचा आरोप

रेड बुलने आपल्या याचिकेत म्हटलंय की, ते २००२ पासून भारतात 'एनर्जी ड्रिंक' याच नावाने आपली उत्पादने विकत आहेत. ३० जूनचा आदेश काढण्यापूर्वी आम्हाला कोणतीही पूर्वसूचना दिली नाही किंवा आमचं म्हणणंही ऐकून घेतलं नाही, असा आरोप कंपनीने केला आहे. जुलै महिन्यात काढलेल्या पत्रामुळे देशभरात अनेक ठिकाणी आमच्या उत्पादनांवर कारवाई झाली आणि माल जप्त करण्यात आला, असा दावाही रेड बुलने केला आहे.

FSSAI ने अचानक आपली भूमिका का बदलली, असा प्रश्न कंपनीने विचारला आहे. याचिकेनुसार, मार्च २०२४ मध्ये FSSAI नेच एक मार्गदर्शक सूचना (अॅडव्हायझरी) जारी केली होती. यात कॅफिनयुक्त पेयांच्या श्रेणीत येणाऱ्या उत्पादनांसाठी 'एनर्जी ड्रिंक' हा शब्द वापरण्यास परवानगी असल्याचं स्पष्ट केलं होतं.