सार

PM Narendra Modi At Ayodhya : एक काळ असा होता की अयोध्येत रामलला तंबूमध्ये विराजमान होते. पण आज केवळ रामलला यांनाच नव्हे तर देशाच्या चार कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरुपी घर मिळाले आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत केले.

PM Narendra Modi At Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (30 डिसेंबर 2023) अयोध्या शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित देखील केले. 

आपल्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी राम मंदिराचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आज संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळे अयोध्यावासीयांमध्ये दिसणारा हा जल्लोष आणि उत्साह स्वाभाविक आहे. तुमच्याप्रमाणेच मी देखील उत्सुक आहे"

“…वारसा जपावाच लागेल”

पंतप्रधान पुढे असेही म्हणाले की, "जगातील कोणत्याही देशाला विकासाची नवी उंची गाठायची असेल तर त्या देशाला स्वतःचा वारसा जपावाच लागेल. आपल्याला लाभलेला वारसा आपल्याला प्रेरणा देतो. आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. त्यामुळे आजचा भारत देश प्राचीन आणि नवीन गोष्टी आत्मसात करून पुढे वाटचाल करत आहे".

“रामललांना मिळाले कायमस्वरुपी घर”

"एक काळ असा होता की अयोध्येत रामलला तंबूमध्ये विराजमान होते. आज केवळ रामलला यांनाच नव्हे तर देशातील चार कोटी गरिबांनाही कायमस्वरूपी घर मिळाले आहे, असेही पंतप्रधान मोदींनी यावेळेस म्हटले.

"अयोध्या उत्तर प्रदेशच्या विकासाला देईल दिशा"

पंतप्रधान नरेंद्र मोदी असेही म्हणाले की,"अयोध्या संपूर्ण उत्तर प्रदेशाच्या विकासाला दिशा देणार आहे. अयोध्येत श्री रामाचे भव्य मंदिर उभारल्यानंतर येथे येणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. हे लक्षात घेऊन आमचे सरकार अयोध्येत हजारो कोटी रुपयांचे विकासकार्य करणार आहे. आज मला अयोध्या धाम विमानतळ आणि रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. अयोध्या विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आले, याचा मला आनंद आहे."

“22 जानेवारीला साजरी करा दिवाळी”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असेही म्हटले की,"22 जानेवारीला प्रभू राम अयोध्येत विराजमान होतील, तेव्हा घरोघरी दिवा लावा आणि दिवाळी साजरी करा. 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण भारतात झगमगाट झाला पाहिजे. पण माझी सर्व देशवासीयांना एक विनंती देखील आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकाची अयोध्येत येण्याची इच्छा आहे. पण प्रत्येकाला येथे येणे शक्य नाही, हे तुम्हालाही माहिती आहे.

प्रत्येकासाठी अयोध्येमध्ये दाखल होणे खूप कठीण आहे. त्यामुळे सर्व रामभक्तांना विनंती करतो की 22 जानेवारीला विधिवत कार्यक्रम पार पडल्यानंतर 23 जानेवारीनंतर आपण आपल्या सोयीनुसार अयोध्येत यावे. 22 जानेवारीला अयोध्येत येण्याची योजना आखू नये. प्रभू रामांना त्रास होईल असे काहीही आपण भाविक करू शकत नाही. प्रभू रामांचे आगमन होत आहे, त्यामुळे आपण काही दिवस वाट पाहुया. 550 वर्षे वाट पाहिली आहे. त्यामुळे अजून काही दिवस थांबा."

आणखी वाचा :

Ayodhya Dham Station : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमृत भारत व वंदे भारत गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा

SPG कमांडोने सेल्फी घेण्यास रोखले, पण पंतप्रधान मोदींनी मुलांची इच्छा अशी केली पूर्ण

अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पाहा PHOTOS