काँग्रेसला वाटलं होतं की निवडणूक ही फक्त एक औपचारिकता आहे. पण बती कुमारी यांनी अपक्ष आणि काँग्रेस उमेदवार म्हणून भरलेले अर्ज मागे घेतले आणि सर्वांना धक्का दिला.
अलवार: चेहरा झाकून, वेगवेगळे कपडे घालून एकाच पदासाठी तीन वेगवेगळे अर्ज दाखल करण्यात आले. आणि मग महत्त्वाच्या वेळी बाकीचे अर्ज मागे घेत ही महिला भाजपची अधिकृत उमेदवार बनून पंचायत समितीची अध्यक्ष झाली. आपला उमेदवार वेश बदलून भाजपच्या तंबूत गेल्याने राजस्थानात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानच्या दीग जिल्ह्यातील ब्रिज नगर पंचायत समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हा सगळा नाट्यमय प्रसंग घडला. 28 वर्षांच्या बती कुमारी यांनी भाजप, काँग्रेस आणि अपक्ष अशा तीन वेगवेगळ्या रूपात अर्ज भरला होता. निवडणूक ही केवळ औपचारिकता आहे, असं काँग्रेसला वाटत होतं. मात्र त्याच वेळी बती कुमारी यांनी आपला काँग्रेस आणि अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे बती कुमारी कमळ चिन्हावर अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या.
सुरुवातीला माजी आमदारासोबत काँग्रेस उमेदवार म्हणून बती कुमारी यांनी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर भाजपच्या मंत्र्यासोबत जाऊन त्यांनी भाजप उमेदवार म्हणूनही अर्ज भरला. या दोन्ही अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत फरक एवढाच होता की, बती कुमारी यांनी साडी बदलून सलवार कमीज घातला होता. दोन्ही वेळा त्यांनी आपला चेहरा झाकलेला होता. यानंतर त्यांनी अपक्ष म्हणूनही अर्ज भरला. ब्रिज नगर पंचायत समितीच्या 14 व्या वॉर्डातून बती कुमारी या अपक्ष म्हणून जिंकून आल्या होत्या. ब्रिज नगर पंचायत समितीत भाजपला फक्त चार जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसकडे 16 जागा होत्या. इथे 9 अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत. 29 सदस्यांच्या पंचायत समितीत स्पष्ट बहुमत असतानाही काँग्रेसने अपक्ष उमेदवार बती कुमारी यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. हा निकाल आल्यानंतर बती कुमारी यांना उमेदवार बनवण्यासाठी पुढाकार घेणारे काँग्रेसचे माजी आमदार वाजीब अली यांनी पीसीसी सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
पैसा आणि ताकदीचा वापर करून भाजपने आमचा उमेदवार पळवला, असा आरोप वाजीब अली यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची माफी मागत आपण कोणतंही पद न घेता सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, अर्ज भरण्याची प्रक्रिया नियमांनुसारच झाली असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार अर्ज भरता येतात, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव राजेश वर्मा यांनी दिली. तसेच, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सर्व प्रक्रियेचं पालन केल्याचं दीगचे जिल्हाधिकारी मयंक मनीष यांनी सांगितलं.










