सौदी अरेबियातील सुरक्षेच्या कारणास्तव इंडिगो आणि अकासा एअर या विमान कंपन्यांनी आपल्या सेवांमध्ये मोठे बदल केले आहेत. काही उड्डाणे पुन्हा सुरू होत असली तरी, बहुतांश उड्डाणे 2026 आणि 2027 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
रियाध: सौदी अरेबियातील सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि ऑपरेशन्सचा विचार करून भारतातील प्रमुख विमान कंपन्यांनी त्यांच्या उड्डाणांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. इंडिगोने जेद्दाह आणि मदिनासाठी निवडक उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रियाध आणि दम्माममधील सेवा 7 डिसेंबर 2026 पर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तसेच, अकासा एअरनेही सौदीमधील विमानसेवा जानेवारी 2027 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडिगोने सांगितले की, ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली आहेत, त्यांना बुकिंगच्या वेळी दिलेल्या संपर्क माहितीवर वेळेवर अपडेट्स दिले जात आहेत. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी इंडिगोची अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवर आपल्या विमानाचे स्टेट्स तपासून पाहावे. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असल्याचे इंडिगोने प्रवाशांसाठी जारी केलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे. या परिस्थितीत प्रवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या नव्या ट्रॅव्हल ॲडव्हायजरीनुसार, अकासा एअरने आधी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत स्थगित केलेली उड्डाणे आता जानेवारी 2027 पर्यंत वाढवली आहेत. नव्या निर्णयानुसार, जेद्दाहसाठीची उड्डाणे 10 जानेवारी 2027 पर्यंत, तर रियाधसाठीची उड्डाणे 31 जानेवारी 2027 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. सौदीतील विमानतळ आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर असलेल्या धोक्यांचा आणि हल्ल्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे अकासा एअरने स्पष्ट केले आहे.
अकासा एअरने माहिती दिली आहे की, उड्डाण रद्द झाल्यामुळे ज्या प्रवाशांचा प्रवास रखडला आहे, त्यांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत मिळतील. किंवा त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा असेल. जे प्रवासी रिफंड घेण्यास इच्छुक आहेत, त्यांना 7 दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यात पैसे परत मिळतील. ट्रॅव्हल एजन्सी किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक केलेल्या प्रवाशांनी रिफंड किंवा तारीख बदलण्यासाठी त्यांच्या संबंधित एजन्सीशी संपर्क साधावा.
विमान कंपन्यांच्या या निर्णयाचा सौदीत राहणाऱ्या भारतीयांना आणि उमराह यात्रेकरूंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इतर आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनीही सौदीच्या उड्डाणांवर निर्बंध लादले आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी विमानाची स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.










