उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पोलिसांनी एका घराची जमीन खोदून ३ ते ४ कोटी रुपये जप्त केले आहेत. हे पैसे तीन स्टीलच्या ड्रममध्ये भरून जमिनीखाली ५ मीटर खोल लपवून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जमिनीखालून घबाड हाती लागलं आहे. नवाबगंज परिसरातील एका घराची जमीन खोदून पोलिसांनी तब्बल ३ ते ४ कोटी रुपये जप्त केले आहेत, अशी माहिती गुरुवारी देण्यात आली. हे पैसे तीन स्टीलच्या ड्रममध्ये भरून जमिनीखाली ५ मीटर खोल लपवून ठेवले होते.
जमिनीखाली सापडले कोट्यवधी रुपये!
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बढईपूर गावातील एका घरावर छापा टाकला. तिथे त्यांनी एका खोलीची जमीन खोदायला सुरुवात केली. साधारण ५ मीटर खोदल्यानंतर पोलिसांना तीन छोटे स्टीलचे ड्रम सापडले. हे ड्रम उघडताच आत ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल रचून ठेवलेले दिसले. पैसे खराब होऊ नयेत म्हणून ते काळ्या पॉलिथिनमध्ये गुंडाळून ठेवले होते.
या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतलं आहे. तसंच प्राप्तिकर विभागालाही (Income Tax) याची माहिती दिली आहे. सध्या पोलिसांनी हे घर सील केलं असून तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घर एका यादव कुटुंबाचं आहे. राकेश यादव आणि राजेश यादव नावाचे दोन भाऊ पुण्यात काम करायचे. २०२० मध्ये ते आपल्या गावी परतले होते.
गावात एक दिवसापूर्वी काहीतरी वाद झाला होता. त्यातूनच पोलिसांना या लपवलेल्या पैशांचा सुगावा लागला. या कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता असल्याचं तपासात समोर आलं आहे. रोजच्या खर्चासाठी ते थोडे थोडे पैसे बाहेर काढायचे. गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, पुण्यातून परतल्यानंतर या दोन भावांनी बरीच जमीन आणि नवीन ट्रॅक्टर विकत घेतले होते. त्यांच्या या अचानक आलेल्या श्रीमंतीमुळे अनेकांना संशय आला होता.
कुठून आले एवढे पैसे?
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे, पण तो उडवाउडवीची उत्तरं देत आहे. एवढी मोठी रक्कम नेमकी कुठून आली, याचा तपास आता सुरू आहे. हे दोन्ही भाऊ पुण्यात ज्या कंपनीत काम करत होते, तिचीही माहिती पोलीस काढत आहेत.




