सार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याने राजकरण तापले आहे.

Political Reactions on CAA : केंद्र सरकारने देशात नुकताच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. या संदर्भातील एक अधिसूचना सरकारने सोमवारी (11 मार्च) जारी केली आहे. वर्ष 2020 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा पारित करण्यात आला होता. अशातच सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याने राजकरण तापले आहे. देशात एनआरसी (NRC) आणि सीएए पारित केल्यानंतर वर्ष 2020 मध्ये दिल्लीसह देशभरातील ठिकठिकाणी आंदोलने आणि दंगली झाल्या. याशिवाय काहींना आपला यामध्ये गमवावा लागला होता. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आधीच म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीआधी देशात सीएए लागू केला जाईल.

मोदींची गॅरेंटी असल्याचे भाजपने म्हटले…
नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यानंतर भाजपने पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय ही मोदींची गॅरेंटी असल्याचीही प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे.

ममता बॅनर्जींचा मोदी सरकावर हल्लाबोल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी देशात सीएए लागू केल्यानंतर मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जींनी म्हटले की, "तुम्ही सहा महिन्यांधीच सीएए संदर्भातील नियम सांगितले पाहिजे होते. जर एखादी चांगली गोष्ट झाल्यास त्याचा नेहमीच पाठपुरावा आणि कौतुक करतो. पण देशासाठी जे योग्य नाही ते केल्यास नक्कीच तृणमूल काँग्रेस आवाज उठवणार आणि त्याचा विरोध करेल. मला माहितेय रमजानआधी सीएएची घोषणा का करण्यात आलीय. मी नागरिकांना शांत आणि कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये यासाठी आवाहन करते."

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले कौतुक
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी सीएए लागू केल्यानंतर म्हटले की, "पीडित मानवतेच्या कल्याणासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याचा निर्णय ऐतिसाहिक आहे. यामुळे पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील पीडित अल्पसंख्यांना सन्मानाने आयुष्य जगण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. याशिवाय सीएए अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळणाऱ्या सर्वांचेही हार्दिक अभिनंदन."

इलेक्टोरल बॉण्डचा हिशोब द्यावा लागेल- अखिलेश यादव
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी म्हटले की, "देशातील नागरिक आपले पोट भरण्यासाठी बाहेर जात आहे, अशाच नागरिकत्व कायदा आणल्याने काय होणार आहे? जनतेला भाजपच्या राजकरणाची समीकरणे कळत आहेत. याशिवाय भाजपने हे सांगावे की, त्यांच्या 10 वर्षांच्या सरकारच्या काळात लाखो नागरिकांनी देशाचे नागरिकत्व का सोडले आहे. काहीही होऊ द्या, आज ना उद्या इलेक्टोरल बॉण्डचा हिशोब द्यावा लागणारच आहे. यानंतर केअर फंडाचा देखील हिशोब द्यावा लागेल."

सीएए संविधानाच्या विरोधात - डीएमके
डीएके प्रवक्ता टीकेएस एलंगोवन यांनी म्हटले की, या देशाला हिंदुत्वाच्या देशात बदलण्यामागील हे पहिले पाऊल आहे, जे देशाच्या संविधानाच्या विरोधात आहे. भाजप सरकार संविधानातील सर्व वर्गांचे उल्लंघन करण्यासाठी ओखळली जाते.

सीएए लागू केल्यानंतर असदुद्दीन औवेसी यांची संतप्त प्रतिक्रिया
देशभरात सीएए लागू केल्यानंतर एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. औवेसी यांनी म्हटले की, "आधी निवडणुकीचे वारे वाहणार आणि नंतर सीएएचे नियम येतील. सीएए विभाजनकारी असण्यासह गोडसेंच्या विचारसणीवर आधारित आहे. जी मुस्लीम बांधवांना दु्य्यम दर्जेचा नागरिक बनवू पाहत आहे. छळ झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आश्रय द्या, पण नागरिकत्व हे धर्म किंवा राष्ट्रीयत्वावर आधारित नसावे. एनपीआर-एनआरसीसह सीएएचा उद्देश केवळ मुस्लीमांना लक्ष करण्याचे आहे. यामागील कोणताही दुसरा उद्देश नाही. रस्त्यांवर उतरलेल्या नागरिकांकडे याचा विरोध करण्याव्यतिक्त कोणताही दुसरा पर्याय नाही."

आणखी वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात 10 वंदे भारत एक्सप्रेसचे वर्च्युअली उद्घाटन

देशभरात CAA लागू, लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले - विकासकामांमुळे काँग्रेसची झोप उडाली, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत बाईक चालवण्याचा रंजक किस्सा सांगितला