पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारपासून ४ दिवसांच्या कॅनडा, सायप्रस आणि क्रोएशिया दौऱ्यावर जाणार आहेत.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारपासून ४ दिवसांच्या कॅनडा, सायप्रस आणि क्रोएशिया दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी कॅनडामध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेत मोदी सहभागी होणार आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतरचा हा मोदींचा पहिला परदेश दौरा आहे.

१५ जून रोजी सायप्रसला भेट देणार पंतप्रधान, त्यानंतर कॅनडा आणि नंतर क्रोएशियाला जातील. कॅनडासोबतच्या राजनैतिक वादानंतर प्रथमच कॅनडाला जाणारे मोदी तिथे १६, १७ रोजी होणाऱ्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून सहभागी होतील. क्रोएशियाला हा भारताच्या पंतप्रधानांचा पहिला दौरा असेल, तर सायप्रसला दोन दशकांनंतर भारताच्या पंतप्रधानांचा दौरा असेल.

अयोध्येतील रामदरबार शनिवारपासून मर्यादित प्रमाणात दर्शनासाठी खुला

अलीकडेच येथील राममंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्थापित करण्यात आलेल्या राम दरबार शनिवारी भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी माहिती दिली की, 'संध्याकाळी ५ ते ७ आणि संध्याकाळी ७ ते रात्री ९ या दोन वेळेत मर्यादित संख्येनेच प्रवेशिका दिल्या जातील. शनिवारपासून राममंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना राम दरबारमध्येही प्रवेश मिळेल. रामलल्ला दर्शनासाठी दिल्या जाणाऱ्या प्रवेशिकेप्रमाणेच, राम दरबारसाठीही प्रवेशिका उपलब्ध असतील'.

काश्मीर पाकिस्तानचा भाग दाखवणारा नकाशा पोस्ट केल्याबद्दल इस्रायलने दिली माफी

भारताचा मुकुट जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवणारा नकाशा इस्रायलने आपल्या वेबसाइटवर पोस्ट केला होता. आपली चूक लक्षात येताच इस्रायलने भारताची माफी मागितली. इस्रायलच्या संरक्षण दलाने इराणी क्षेपणास्त्रांची रेंज दाखवण्यासाठी एक्स वर एक पोस्ट केली होती. त्यात भारताचा नकाशा चुकीचा दाखवला होता आणि जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवले होते. यावर भारतीयांनी सोशल मीडियावर आक्षेप घेतला होता. 'राजनैतिक बाबींमध्ये कोणीही खरा मित्र नसतो. भारत तटस्थ का आहे हे आता कळले' असा संताप व्यक्त केला होता. यानंतर संरक्षण दलाने माफी मागितली आणि 'ही पोस्ट त्या भागाचे वर्णन आहे. नकाशा सीमा अचूकपणे दाखवण्यात अयशस्वी झाला आहे. चित्रामुळे झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो' असे म्हटले आहे.

एसबीआयच्या कर्जाच्या व्याजदरात ०.५०% घट

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने कर्जाच्या व्याजदरात ०.५% घट केली आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात घट होईल.

या बदलामुळे EBLR आधारित व्याजदर ८.६५% वरून ८.१५% वर आला आहे. हा बदल १५ जूनपासून लागू होईल.

याचवेळी काही विशेष ठेवींवरील व्याजदरही एसबीआयने कमी केले आहेत.

२६९ नवीन कोविड रुग्ण, ९ मृत्यू: सक्रिय रुग्णांची संख्या ७४०० वर

गेल्या २४ तासांत देशात २६९ नवीन कोविड रुग्ण आढळले असून, त्यामुळे सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ७,४०० वर पोहोचली आहे. दरम्यान, ९ नवीन मृत्यूची नोंद झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले.

कर्नाटकात एकाच दिवशी १३२ सक्रिय कोविड रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये ७९, केरळमध्ये ५४, मध्य प्रदेशात २०, सिक्कीममध्ये ११, तमिळनाडूमध्ये १२ आणि हरियाणामध्ये ९ सक्रिय रुग्ण आढळले आहेत, असे मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

कोविडमुळे गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ४, केरळमध्ये ३, तमिळनाडू आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक कोविड मृत्यूची नोंद झाली आहे. २०२४ च्या १ जानेवारीपासून आतापर्यंत ८७ कोविड मृत्यू झाले आहेत.

गेल्या २४ तासांत ९९१ जण कोविडमधून बरे झाले आहेत.

केरळमध्ये सर्वाधिक कोविड रुग्ण आहेत. तिथे सक्रिय रुग्णांची संख्या २,१०९ वर पोहोचली आहे.