गुजरातमधील विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढत असून, आतापर्यंत २७० जणांचे मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

अहमदाबाद : गुजरातमधील विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढत असून, आतापर्यंत २७० जणांचे मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या विमान कोसळण्यामागचे कारण शोधण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

सुरुवातीला विमानातील २४१ प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, दुर्घटनास्थळावरून आतापर्यंत एकूण २७० मृतदेह अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. येथील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (AFES) युनिटने मेघानी नगरच्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातून गेल्या २४ तासांत एक मृतदेह आणि अर्धवट जळालेल्या शरीराचे अवशेष जप्त केले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गुरुवारी झालेल्या या भयंकर दुर्घटनेच्या तपासासाठी केंद्र सरकारने केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. ही समिती विमान पतनाचे कारण आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल. या समितीने तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

  • गुजरातमधील विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढत असून, आतापर्यंत २७० जणांचे मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
  • एअर इंडियाच्या विमान पतनाचे कारण शोधण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
  • सुरुवातीला विमानातील २४१ प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले होते.

लंडनला निघालेल्या बंगळुरूच्या आयटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

अहमदाबाद विमान अपघातात बंगळुरूच्या एका आयटी कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बंगळुरूच्या एका खासगी कंपनीत आयटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या २८ वर्षीय हरप्रीत कौर लंडनमधील आपले पती रॉबी होरा यांना भेटण्यासाठी लंडनला जात होत्या. त्या १९ जून रोजी लंडनला जाण्याचा विचार करत होत्या. पण पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी आधीच तिकीट बुक केले होते. लंडनला गेल्यानंतर दोघांनी युरोपचा प्रवासही नियोजित केला होता. मात्र दुर्दैवाने, पतीला भेटण्याआधीच हरप्रीत यांचा एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्यू झाला.