पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर पुन्हा एक रील शेअर केली. या शेअर केलेल्या रीलने अवघ्या काही तासांत कोट्यावधी व्हूज मिळाले आहेत.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली. या रीलने सोशल मीडियावर इतिहास रचला आहे. पेपर लीक रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर आधारित असणाऱ्या या रीलला अवघ्या काही तासांमध्ये कोट्यावधी व्हूज मिळाले आहेत. याशिवाय रीलने विश्वविक्रम मोडला आहे. ही रील सर्वाधिक पाहिलेली रील म्हणून नोंद करण्यात आली आहे.

30.3 कोटी व्ह्यूजसह नवा जागतिक विक्रम

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पंतप्रधान मोदी यांनी पेपर लीक रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजनांवर आधारित रील शेअर केली होती. ही रील काही तासांतच 30.3 कोटींहून अधिक वेळा पाहिली गेली. यापूर्वीचा इंस्टाग्रामवरील सर्वाधिक व्ह्यूजचा विक्रम 30 कोटींच्या आसपास होता. त्यामुळे मोदींच्या रीलने नवा जागतिक विक्रम केला आहे.

एका रात्रीत 10 लाख नवे फॉलोअर्स

रील व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर युजर्सची संख्या वाढली गेली आहे. अवघ्या एका रात्रीत सुमारे 10 लाख नवीन फॉलोअर्स त्यांच्याशी जोडल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय या रीलला 1.6 कोटींहून अधिक लाईक्स आणि 15 लाखांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. 

मोदींनी मानले नागरिकांचे आभार

रीलला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक व्हिडिओ संदेश शेअर केला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, "आपण दिलेल्या प्रेम, पाठिंबा आणि सकारात्मक सूचनांसाठी मी मनःपूर्वक आभारी आहे. तुमचे प्रेम आणि विश्वास मला पुढेही देशासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देत राहील."

View post on Instagram

तरुणांशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न

अलीकडच्या काळात परीक्षा प्रणालीतील सुधारणा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावर देशभरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषतः तरुणांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे.