NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटीच्या घटनांवर केंद्र सरकार आणखी कठोर भूमिका घेणार आहे. यासोबत आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पेपरफुटीविरोधात चर्चा होणार आहे.

मुंबई : देशभरात नीट युजी (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन देशभरात सुरू आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होणार आहे. यासोबत खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याच प्रस्तावावर आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. यासोबत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात सरकारची 'झिरो टॉलरन्स' भूमिका कायम राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

पेपरफुटीविरोधात आणखी कठोर पावले

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ मेसेजमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, पेपरफुटीच्या घटनांवर सरकार आणखी कठोर कारवाई करणार आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पेपरफुटी रॅकेटविरोधात निर्णायक कारवाई केली जाईल. त्यासोबत दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

Scroll to load tweet…

फास्ट-ट्रॅक न्यायालये आणि कडक शिक्षेचा प्रस्ताव

पंतप्रधानांनी सांगितले की, संबंधित विभागांनी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करणे आणि पेपरफुटी प्रकरणांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद असलेला प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. या प्रस्तावावर आज मंत्रिमंडळात चर्चा होईल. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हे विधेयक संसदेच्या आगामी आठवड्यात मांडण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

22 लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्याचा प्रयत्न

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पेपरफुटीच्या घटनेनंतर सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देणे हे होते. सरकारने तातडीने उपाययोजना करून सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा कमी कालावधीत पूर्ण केल्या. तसेच 19 जुलै रोजी निकालही जाहीर करण्यात आला असेही पंतप्रधानांनी म्हटले.

देशभरात आंदोलन कायम 

सध्या नीट युजी पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. बिहारमध्ये आंदोलन सर्वाधिक तीव्र झाले. दरभंगा आणि जहानाबाद येथे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. यासोबत हवेत गोळीबार केल्याची माहिती आहे. 

तसेच पटना विद्यापीठासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्याचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान, पटना पोलिसांनी आंदोलनादरम्यान गोंधळ घालणाऱ्या संशयितांचे फोटो जाहीर केले आहेत.