सार

गुवाहाटी येथील खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर एका महत्त्वाच्या जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “तुमचे स्वप्न पूर्ण करणे हा माझा संकल्प आहे. ते पूर्ण करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही."

PM Modi In Assam : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार 3 फेब्रुवारी 2024 रोजी आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. रविवार 4 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथील खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर एका महत्त्वाच्या जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आधीच्या सरकारने काहीही करण्याचा विचारही केला नाही. परंतु तुमचे स्वप्न पूर्ण करणे हा माझा संकल्प आहे. ते पूर्ण करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही."

आधीच्या सरकारवर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले की, “2047 पर्यंत भारताला विकसित देश व जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठी आम्हाला आसामच्या लोकांची मदत हवी आहे. तुमची सगळी स्वप्ने पूर्ण होतील.”

 

 

देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुलभ करण्याचे आमचे उद्दिष्ट

या समारंभात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुलभ करणे हे त्यांच्या सरकारचे उद्दिष्ट आहे. केंद्रातील तसेच राज्यातील भाजपच्या डबल इंजिन सरकारने सुरू केलेल्या योजना प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यादरम्यान कामाख्या मंदिर कॉरिडॉर (498 कोटी रुपये), गुवाहाटीमधील नवीन विमानतळ टर्मिनलपासून सहा पदरी रस्ता (358 कोटी रुपये), नेहरू स्टेडियमचे फीफामध्ये अपग्रेडेशन अशा काही मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी केली.अशा रीतीने त्यांनी एकूण 11,600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्याची तरतूद

सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही गेल्या वर्षांत विक्रमी संख्येने महाविद्यालये आणि विद्यापीठे बांधली आहेत तसेच आयआयएम आणि आयआयटीचे जाळे पसरवले आहे. मागील सरकारच्या कार्यकाळात आसाममध्ये 6 वैद्यकीय महाविद्यालये होती, ज्यांची संख्या आज 12 झाली आहे.”

पंतप्रधान पुढे असेही म्हणाले की, “आम्ही ४ कोटी लोकांसाठी कायमस्वरूपी घरे बांधली आहेत. उज्ज्वला योजनेमुळे आसाममधील महिला आणि भगिनींना धुरापासून मुक्तता मिळाली आहे. आमच्या या फोकसचा थेट फायदा देशातील तरुणांना झाला आहे.”

“आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो” - पंतप्रधान मोदी

अर्थसंकल्पाची माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आम्ही वीज बिल शून्यावर आणू व येथे रुफ टॉप प्रकल्प सुरू केला जाईल. यामुळे 1 लाख घरांना वीज बिल भरावे लागणार नाही आणि ते वीज निर्मिती आणि विक्रीही करू शकतील.”

याशिवाय त्यांनी लखपती दीदी प्रकल्पाबाबतही सांगितले. २ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. आसामच्या लाखो भगिनींना लखपती दीदीचा लाभ मिळणार असल्याचे ते म्हणाले. आमच्या सरकारच्या या बजेटमध्ये अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला आणि आशा दीदींनाही आयुष्मान भारत अंतर्गत ५ लाख रुपयांचे मोफत उपचार मिळणार आहेत. पंतप्रधान म्हणाले की, ‘मोदी जे बोलतात ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करतात.

आणखी वाचा -

Ahlan Modi : PM नरेंद्र मोदी UAEमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार, 60 हजारहून अधिक लोकांनी केली नोंदणी

Interim Budget 2024: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लक्षद्वीपसह अन्य बेटांकरिता मोठी गुंतवणूक - निर्मला सीतारमण

लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर होतोय देशभरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव