सार
आज मोदी राज्यसभेत आले. राज्यसभेत प्रवेश करताच भाजपा समर्थकांनी घोषणा देत मोदींचं स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलायला सुरुवात केल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावर उत्तर दिल्यानंतर बुधवारी ते राज्यसभेत आले. सुरुवातीला त्यांचे भाषण विरोधकांनी शांतपणे ऐकून घेतले. परंतु, त्यांच्या भाषणाने पकड घेतल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यामध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आघाडीवर होते. त्यांनी व्हेलमध्ये येऊन मोदींना भाषण थांबण्याची गळ घातली. या सर्व प्रकारावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समज दिली. अखेर विरोधकांनी सभात्याग केला. या सर्व प्रकारावरून जगदीप धनखड यांनी व्यथित होऊन विरोधकांनी मला पाठ दाखवली नसून संविधानाला पाठ दाखवली आहे, असे म्हटले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी भाजपा आणि आरएसएसला लक्ष्य करत मोदींवरही निशाणा साधला होता. त्यांच्या या प्रत्येक मुद्द्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत चोख प्रत्युत्तर दिले. परंतु, हे उत्तर देताना लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. मात्र, या गोंधळातही मोदींनी त्यांचे भाषण सुरूच ठेवले अन् भाषण पूर्ण झाल्यावरच ते शांत बसले. त्यामुळे काल त्यांचा अलिखित विजय झाला, अशी चर्चा झाली. बुधवारी मोदी राज्यसभेत आले. राज्यसभेत प्रवेश करताच भाजपा समर्थकांनी घोषणा देत मोदींचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलायला सुरुवात केल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
नरेंद्र मोदींनी भाषण ठेवले चालू -
मोदींनी भाषण थांबवावं, अशी मागणी होऊ लागली. मात्र, मोदी आपल्या भाषणापासून हटले नाहीत. त्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. परिणामी विरोधकांनी अधिक जोमाने घोषणाबाजी केली. त्यांनी भाषण थांबवण्यासाठी विरोधकांनी नारेजाबी केली. विरोधकांच्या या कृत्यावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांच्या कृतीवर आक्षेप घेतला. तुम्ही सभागृहाचा आणि संविधनाचा अपमान करताय, असं बजावून सांगितलं. परंतु, विरोधक आपल्या मतापासून दूर हटले नाहीत.
विरोधकांनी केला सभात्याग -
विरोधकांनी मला नाही, संविधानाला पाठ दाखवली मोदी आपलं भाषण थांबवत नसल्याचं पाहून अखेर विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी सभात्याग केल्यानतंर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, “अत्यंत दुःखदायक, अमर्यादित हे कृत्य आहे. मी चर्चा केली, मी अनुरोध केला. विरोधी पक्षातील नेत्यांना कोणत्याही अडथळ्याविना बोलण्याची संधी दिली. आज ते सदन सोडून गेले नाहीत, ते मर्यादा सोडून गेले. आज त्यांनी मला पाठ नाही दाखवली.
भारतीय संविधानाला पाठ दाखवली आहे. आज त्यांनी माझा आणि तुमचा अनादर नाही केला, त्या शपथेचा अनादर केला जो संविधानाच्या साक्षीने घेतला आहे. भारताच्या संविधानाची यापेक्षा मोठी अपमानित गोष्ट असू शकत नाही. असं कसं होऊ शकतं, वरिष्ठाचं सभागृह म्हटलं जातं. आपल्याला देशाला मार्गदर्शन करायचं आहे. देशातील १४० कोटी लोक यामुळे दुःखी झाले असतील. विरोधकांनी आपलं म्हणणं मांडलं असेल तर त्यांनी सत्ताधाऱ्यांचंही म्हणणं ऐकलं पाहिजे, यालाच सभागृह म्हणतात.”