Meerut Railway Employee Accused of Leaking Wife's Obscene Photos Online: मेरठमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याने पत्नीचा शारीरिक छळ करून तिचे अश्लील फोटो इंटरनेटवर व्हायरल केल्याचा धक्कादायक आरोप झाला आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. एका महिलेने आपल्याच नवऱ्यावर शारीरिक आणि मानसिक छळासोबतच, तिची डिजिटल प्लॅटफॉर्मवर बदनामी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेचं म्हणणं आहे की, नवऱ्याने तिला मारहाण तर केलीच, पण तिचे अश्लील फोटो इंटरनेटवर अपलोड केले आणि मोबाईल नंबरसोबत 'रेट' सुद्धा लिहिला. यानंतर महिलेला सतत घाणेरडे कॉल्स आणि मेसेज येत आहेत.
लग्नानंतर काही काळातच छळाला सुरुवात
या महिलेचं लग्न सुमारे तीन वर्षांपूर्वी मेरठच्या लालकुर्ती पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याशी झालं होतं. पीडितेचा आरोप आहे की, लग्नानंतर काही काळातच नवरा, सासू आणि नणंदेने हुंड्यासाठी आणि इतर कारणांवरून तिला त्रास द्यायला सुरुवात केली. घरात रोज अपमान, शिवीगाळ आणि मारहाण होत होती. मानसिकदृष्ट्या इतकं खच्चीकरण केलं गेलं की ती अनेकदा कोलमडून पडली होती, असं महिलेचं म्हणणं आहे.
"आठ दिवस खोलीत डांबलं, गरम चिमट्याने चटके दिले"
तक्रारीत महिलेने एका अत्यंत वेदनादायी घटनेचा उल्लेख केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, सुमारे वर्षभरापूर्वी नवऱ्याने तिला आठ दिवस एका खोलीत डांबून ठेवलं. यावेळी गरम चिमट्याने तिच्या शरीरावर चटके दिले. नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतर तडजोड झाली आणि ती पुन्हा सासरी गेली, पण परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. अखेर ती कंकरखेडा येथील आपल्या माहेरी परतली.
सोशल मीडियावर अपलोड केले अश्लील फोटो
महिलेचा आरोप आहे की, माहेरी आल्यानंतर नवऱ्याच्या विकृत वागण्याला आणखी ऊत आला. त्याने तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. फोटोंसोबत घाणेरड्या आणि अश्लील कमेंट्स लिहिल्या. सर्वात गंभीर आरोप म्हणजे, आरोपीने फोटोंसोबत महिलेचा मोबाईल नंबर सार्वजनिक केला आणि त्यावर 'रेट' लिहिला. यानंतर पीडितेला अनोळखी लोकांचे फोन आणि मेसेज येऊ लागले. हे प्रकरण केवळ कौटुंबिक हिंसाचाराचं नाही, तर सायबर गुन्हेगारीचंही बनलं आहे.
पोलिसांनी तपास सुरू केला
सोमवारी पीडित महिलेने मेरठच्या एसएसपी कार्यालयात जाऊन लेखी तक्रार दिली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून एसएसपी रोहित सिंह सजवान यांनी दौरालाच्या सीओला सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आयटी ॲक्ट आणि छळाशी संबंधित कलमांनुसार तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
डिजिटल प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी वाढती चिंता
खाजगी वाद आता डिजिटल जगापर्यंत कसे पोहोचत आहेत, हे या प्रकरणातून दिसतं. एखाद्याची परवानगी न घेता त्याचा फोटो किंवा नंबर शेअर करणं हा कायद्याने गुन्हा आहे. तज्ज्ञांच्या मते, असं काही घडल्यास पीडितांनी तात्काळ स्क्रीनशॉट घेऊन पोलिसांत तक्रार करावी आणि सायबर सेलशी संपर्क साधावा.


