पालघरमध्ये एका भामट्याने एटीएममध्ये वॉकी-टॉकी लपवून एका महिलेला २.९ लाखांचा गंडा घातला. एटीएम मशीनमध्ये कार्ड अडकल्यानंतर त्याने तिला लांबूनच सूचना दिल्या. पोलिसांनी जितेंद्र रामदेव पाल याला अटक केली असून २.६ लाख रुपये आणि वॉकी-टॉकी जप्त केला आहे.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका भामट्याने एटीएममध्ये वॉकी-टॉकी लपवून एका महिलेला तब्बल २.९ लाख रुपयांचा गंडा घातला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी बोईसरच्या शिवाजी नगर येथील एका एटीएम सेंटरमध्ये ही घटना घडली. समीरा मुशर्रफ खान या महिला तिथे पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या.

एटीएम मशीनमध्ये अडकले डेबिट कार्ड

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, समीरा यांनी सुरुवातीला २७,००० रुपये यशस्वीपणे काढले. पण त्यानंतर त्यांचे डेबिट कार्ड एटीएम मशीनमध्येच अडकले. त्या कार्ड बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्यांना एक आवाज ऐकू आला. 'तुम्ही सिक्युरिटी कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहात,' असे त्या आवाजाने सांगितले. तसेच, कार्ड जबरदस्तीने ओढू नका, असा सल्ला देत 'कॅन्सल' आणि 'एंटर' बटण दाबून तीन वेळा पिन टाकण्यास सांगितले.

पिन टाकूनही कार्ड बाहेर आले नाही. तेव्हा त्या आवाजाने समीरा यांना त्यांचे संपर्क तपशील एटीएममध्येच ठेवून जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी तंत्रज्ञ येऊन मशीन उघडेल आणि तुमचे कार्ड परत करेल, असा विश्वास त्यांना देण्यात आला.

या बोलण्यावर विश्वास ठेवून समीरा एटीएममधून बाहेर पडल्या.

बँक खात्यातून २.९ लाख रुपये गायब

थोड्याच वेळात समीरा यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यांच्या बँक खात्यातून तब्बल २.९ लाख रुपये काढले गेल्याचे त्यात नमूद होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट बोईसर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

वॉकी-टॉकीच्या ट्रिकचा पर्दाफाश, आरोपीला अटक

या प्रकरणी पोलिसांनी ठाण्यात राहणाऱ्या जितेंद्र रामदेव पाल याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला. आपण एटीएम सेंटरमध्ये एक वॉकी-टॉकी लपवून ठेवला होता आणि त्याद्वारेच आपण समीरा यांना सूचना देत होतो, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.

पोलिसांनी जितेंद्रकडून २.६ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला वॉकी-टॉकी जप्त केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, जितेंद्रने अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

(वृत्तसंस्थांच्या इनपुट्ससह)