नदीत एक व्यक्ती कचरा टाकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप असून, नागरिकांच्या बेजबाबदारपणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
देशाला स्वच्छ बनवण्याच्या गोष्टी कितीही केल्या जात असल्या, तरी सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्याची सवय काही जात नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती कावेरी नदीत कचरा टाकत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संताप आणि निराशा पसरली आहे. विशेष म्हणजे, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या पाण्यावरून अनेक दशकांपासून वाद सुरू आहे आणि अनेकदा हा वाद संघर्षाचं कारणही ठरला आहे.
'लोकांमध्ये बदल गरजेचा'
ही घटना कोडागु जिल्ह्यातील मुरनाड शहराजवळील कोंडंगेरी गावात घडली आहे. इथे वाहणाऱ्या कावेरी नदीत एका तरुणाने कचरा फेकला. व्हिडिओमध्ये दिसतंय की, पुलावर गाडी थांबवून एक व्यक्ती मोठ्या पिशवीतला कचरा नदीत फेकत आहे. त्यावेळी त्याच्यासोबत एक महिलाही उभी असलेली दिसते. एकीकडे सरकार पर्यावरण आणि जलस्रोत वाचवण्यासाठी जनजागृती करत असताना, दुसरीकडे अशा घटना घडत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडिया युजर्सनी तीव्र शब्दात टीका केली आहे. 'फक्त स्वच्छतेचा प्रचार करून आणि देशाला स्वच्छ ठेवण्याचं आवाहन करून काही होणार नाही, खरा बदल लोकांच्या वागणुकीत व्हायला हवा,' असं मत अनेकांनी मांडलं आहे.
कडक कारवाईची गरज
“अशाने भारत स्वच्छ देश कसा होणार?” असा सवाल अनेक जण विचारत आहेत. नदीत कचरा टाकल्याने पर्यावरण आणि जलचरांना गंभीर धोका निर्माण होतो, असंही काहींनी म्हटलं आहे. विशेषतः प्लास्टिकसारखा कचरा नष्ट व्हायला शेकडो वर्षं लागतात, ज्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. निसर्ग संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनासाठी अनेक कायदे असले तरी, ते न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काहींनी केली आहे.
'नद्या आणि इतर नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,' असंही अनेकांनी लिहिलं आहे. काही युजर्सनी तर गाडीच्या नंबर प्लेटच्या (KA 04 MP 2266) आधारे कचरा फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

