देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे दर वाढल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन कांद्याचा पुरवठा ठिकठिकाणी केला जाईल.

मुंबई : कांद्याच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट पुन्हा कोलमडू लागले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याच्या किमती झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारने आता बफर स्टॉकमधील कांदा बाजारात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. ज्या शहरांमध्ये कांद्याचे दर अधिक आहेत, त्या भागांत सरकारी साठ्यातील कांदा पाठवून पुरवठा वाढवण्याचा आणि दर नियंत्रणात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

कांदा किती महागला?

शनिवारी देशातील कांद्याचा सरासरी किरकोळ दर सुमारे ४२ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर सुमारे ४५ टक्क्यांनी, तर मागील महिन्याच्या तुलनेत सुमारे १९ टक्क्यांनी वाढला आहे. दिल्लीमध्ये कांद्याचा दर सुमारे ६५ रुपये प्रति किलो, मुंबईतही कांद्याचे दर वाढले गेल्याचे असल्याचे समोर आले आहे. विविध शहरांमध्ये वाढत असलेल्या दरांमुळे आगामी काळात कांद्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता सरकारला चिंता वाढवणारी ठरत आहे.

बफर स्टॉकमधील कांदा का बाजारात आणणार?

महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अचानक वाढल्यास बाजारातील पुरवठा वाढवण्यासाठी सरकारकडे बफर स्टॉक ठेवला जातो. कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी आता याच साठ्याचा वापर केला जाणार आहे. सरकार ज्या भागात कांद्याचे दर जास्त आहेत, तिथे बफर स्टॉकमधील कांदा पाठवणार आहे. त्यामुळे बाजारातील कांद्याचा पुरवठा वाढेल आणि दर कमी होण्यास मदत होईल. संपूर्ण देशभर एकाच वेळी कांदा बाजारात आणण्याऐवजी गरजेनुसार आणि दरांच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या भागांत साठा पाठवला जाणार आहे.

‘कांदा एक्स्प्रेस’ पुन्हा धावणार?

कांद्याची देशभर जलद आणि कमी खर्चात वाहतूक करण्यासाठी ‘कांदा एक्स्प्रेस’ रेल्वे सेवेचा पुन्हा वापर करण्याची तयारी सुरू आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्रातील नाशिकहून दिल्ली, गुवाहाटी आणि लखनौसह इतर शहरांमध्ये बफर स्टॉकमधील कांदा पोहोचवण्यासाठी या सेवेचा वापर करण्यात आला होता.

आता नाशिकहून दिल्ली, चेन्नई, कोची आणि गुवाहाटी यांसारख्या कांद्याचे दर अधिक असलेल्या शहरांमध्ये कांदा पोहोचवण्याची तयारी आहे. रेल्वे वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात कांदा कमी वेळेत आणि तुलनेने कमी खर्चात दूरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवता येणार आहे.

सरकार केवळ बफर स्टॉकवर अवलंबून नाही

कांद्याच्या सध्याच्या दरवाढीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच आगामी काळातील मागणी पूर्ण करण्यासाठीही सरकारकडून तयारी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या सहकार्याने कांद्याचा अतिरिक्त साठा तयार करण्यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे सध्याच्या बाजारातील वाढते दर नियंत्रणात आणण्यासोबतच भविष्यात कांद्याची टंचाई निर्माण होऊ नये, हा सरकारचा उद्देश आहे.

साखरेचे भावही वाढले

 साखरेच्या किरकोळ दरांमध्येही वाढ सुरूच आहे. शनिवारी सुटी साखर (लूज शुगर) ६२.५ रुपये प्रति किलो दराने विकली गेली. हा दर वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी आणि महिन्याभरापूर्वीच्या (जेव्हा भाव ४६ रुपये प्रति किलो होता) तुलनेत २८.५ टक्क्यांनी अधिक आहे. दिल्लीत साखरेचा भाव ६५ रुपये प्रति किलो होता. तर मुंबईत साखरेचा भाव ६९ रुपये प्रति किलो होता.