केरळची १९ वर्षांची कझाया लिझ मेजो जयपूरमध्ये 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२६'ची विजेती ठरली आहे. कायद्याचं शिक्षण घेणारी कझाया आता नोव्हेंबरमध्ये प्युर्टो रिकोमध्ये होणाऱ्या ७५व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करेल.
मुंबई : केरळला आता अभिमान वाटावा अशी आणखी एक सौंदर्यवती मिळाली आहे. केरळची १९ वर्षीय मॉडेल आणि कायद्याची विद्यार्थिनी असलेली कझाया लिझ मेजो 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२६' किताबाची मानकरी ठरली आहे. या विजयामुळे ती आता नोव्हेंबरमध्ये प्युर्टो रिकोमध्ये होणाऱ्या ७५व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. जयपूरमध्ये झालेल्या अंतिम फेरीत देशभरातून आलेल्या स्पर्धकांमध्ये ही चुरशीची लढत झाली.
कोण आहे कझाया लिझ मेजो?
कझाया लिझ मेजो ही मूळची केरळच्या मावेलिक्कारा येथील असून तिचं वय फक्त १९ वर्षे आहे. ती मॉडेलिंगसोबतच कायद्याचं शिक्षणही घेत आहे. २००७ साली जन्मलेली कझाया अबू धाबीमध्ये वाढली. त्यानंतर शिक्षण आणि इतर आवडीनिवडी जोपासण्यासाठी ती भारतात आली. तिला मॉडेलिंग, परफॉर्मिंग आर्ट्स आणि भाषणकला यात विशेष रस आहे. सध्या ती कायद्याचं शिक्षण घेत असून, तिने तब्बल १२ वर्षे शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षणही घेतलं आहे. इतकंच नाही, तर कझायाला गाण्याची आवड असून ती ड्रम्स आणि व्हायोलिनसारखी वाद्यंही वाजवते.
याशिवाय, मनोरंजन क्षेत्राशी तिचा संबंध फक्त गाण्यापुरता मर्यादित नाही, तर तिने 'शायलॉक' या मल्याळम चित्रपटातून अभिनयातही पदार्पण केलं आहे.
जयपूरमध्ये कझाया ठरली सर्वोत्कृष्ट
जयपूरच्या झी स्टुडिओमध्ये 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२६' या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. यात कझायाने तब्बल ५२ स्पर्धकांना मागे टाकत हा किताब आपल्या नावे केला. 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'ची विजेती, मनिका विश्वकर्मा हिने कझायाला हा मानाचा मुकुट प्रदान केला.
या स्पर्धेत तामिळनाडूची वैष्णवी गणेश फर्स्ट रनर-अप ठरली आणि तिला 'मिस इंटरनॅशनल इंडिया २०२६' चा किताब मिळाला. गुजरातची अनुश्री साटवलेकर सेकंड रनर-अप, महाराष्ट्राची तेजस्विनी श्रीवास्तव थर्ड रनर-अप आणि उत्तराखंडची अनुभा वशिष्ठ चौधरी फोर्थ रनर-अप ठरली.
'मिस टीन' ते 'मिस युनिव्हर्स इंडिया' पर्यंतचा प्रवास
कझायाने वयाच्या १७ व्या वर्षी 'मिस टीन दिवा २०२४' हा किताब जिंकला होता. त्यानंतर २०२५ मध्ये तिने 'मिस टीन इंटरनॅशनल' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं, जिथे ती फर्स्ट रनर-अप ठरली. त्या वर्षी स्पेनच्या लोरेना रुईझने हा किताब जिंकला होता.
भारताला आता कझायाकडून अपेक्षा
आता कझाया आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती २०२६ मध्ये प्युर्टो रिको येथे होणाऱ्या ७५व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताकडून सहभागी होईल, त्यामुळे तिच्याकडून देशाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.


