टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना मुदतवाढ देण्यावरून टाटा ग्रुपमध्ये मोठा वाद सुरू झाला आहे. या निर्णयाला नोएल टाटा यांनी कडाडून विरोध केला असून हे मतदान बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केलाय. आगामी सर्वसाधारण सभेत चंद्रशेखरन यांना पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

मुंबई: टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयाला नोएल टाटा यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. चंद्रशेखरन यांना पुन्हा अध्यक्ष करण्यासाठी टाटा सन्सच्या बोर्डाने ४-१ अशा बहुमताने मतदान केले. पण हे मतदान पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी केला आहे. यामुळे टाटा ग्रुपच्या नेतृत्वावरून पुन्हा एकदा मोठा वाद उफाळून आला आहे.

बोर्डाच्या बैठकीत आपण चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला विरोध करत आपली नाराजी नोंदवली होती, असे नोएल टाटा यांनी स्पष्ट केले. कायदेशीर सल्ल्याचा आधार घेत आपल्या 'व्हेटो' अधिकाराला चुकीच्या पद्धतीने डावलण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. टाटा सन्सच्या नियमांनुसार, अशा निर्णयासाठी टाटा ट्रस्टने नामनिर्देशित केलेल्या संचालकांच्या बहुमताची मंजुरी आवश्यक असते. मात्र, मतदानात टाय किंवा अडथळा आल्यास अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे, या कायदेशीर सल्ल्याच्या आधारे व्यवस्थापनाने हा निर्णय रेटून नेला.

आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) एन. चंद्रशेखरन यांना संचालक पदावरून हटवण्यासाठी टाटा ट्रस्ट हालचाली करणार असल्याची दाट शक्यता आहे. जर त्यांचे संचालक पद गेले, तर त्यांना अध्यक्ष म्हणूनही राहता येणार नाही. फेब्रुवारी २०२७ मध्ये आपला कार्यकाळ संपल्यानंतर आपण पद सोडू, असे चंद्रशेखरन यांनी याआधी ऑगस्टमध्येच स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या निवड समितीने नवीन अध्यक्ष शोधण्याची प्रक्रिया सुरू केली असतानाच, बोर्डाच्या बैठकीत या नव्या घडामोडी घडल्या आहेत.