Nehal Modi : पंजाब नॅशनल बँकेच्या 13,500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. मनी लॉन्डरिंग आणि फसवणुकीच्या आरोपांखाली त्याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील सुनावणी 17 जुलै रोजी होणार आहे.
वॉशिंग्टन/नवी दिल्ली : भारताच्या मागणीवरून अमेरिकेतील तपास यंत्रणांनी नीरव मोदीचा भाऊ आणि बेल्जियमचा नागरिक नेहाल मोदी याला जुलै ४ रोजी अटक केली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) 13,500 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असल्याने ही अटक भारतासाठी महत्वाची मानली जात आहे.
नेहाल मोदीवर काय आरोप आहेत?
अमेरिकेतील न्याय विभागाच्या माहितीनुसार, नेहाल मोदीवर प्रिवेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत मनी लॉन्डरिंग आणि फसवणूक, कट रचणे व पुरावे नष्ट करणे यासंबंधी गुन्हे दाखल आहेत.
भारताच्या CBI आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासात नेहाल मोदीने आपल्या भावासाठी नीरव मोदीसाठी अवैध संपत्ती लपवण्याचे व परदेशात हस्तांतरित करण्याचे काम केल्याचे उघड झाले आहे. त्याने शेल कंपन्यांच्या जाळ्यातून कोट्यवधी रुपये परदेशात फिरवले आणि पुरावे नष्ट करून तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचं काय?
नीरव मोदी याचा UK मधून भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला असला, तरी त्याने सतत अपील दाखल करून प्रत्यक्ष प्रत्यर्पणाला विलंब लावला आहे. तो सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. त्याला 2019 मध्ये 'फरार आर्थिक गुन्हेगार' घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याला यावर्षीच्या सुरुवातीस बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये अटक करण्यात आली. तो 2018 पासून अँटिग्वा आणि बारबुडा येथे नागरिकत्व घेऊन राहात होता.
पुढील कायदेशीर पावले
नेहाल मोदीचा पुढील सुनावणीचा दिवस 17 जुलै रोजी ठरवण्यात आला असून, या दिवशी तो जामिनासाठी अर्ज करेल अशी शक्यता आहे. मात्र, अमेरिकेतील सरकारी वकील त्याच्या जामिनाला कडाडून विरोध करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताच्या तपास यंत्रणांना या कारवाईमुळे नीरव मोदी टोळीच्या आर्थिक गुन्ह्यांवर अधिक ठोस पुरावे सादर करता येणार आहेत. या प्रकरणात आता पुढील घडामोडीकडे देशाचं लक्ष लागून राहील.