सार
आयपीएलच्या एक दिवस आधी चेन्नई संघाने मोठी घोषणा करत ऋतुराज गायकवाडला कर्णधार केले आहे. धोनीने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली आहे.
मुंबई : चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आयपीएल सुरू होण्याच्या एक दिवस आधी चाहत्यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने त्याचे कर्णधारपद यंदा ऋतुराज गायकवाडकडे सोपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवा कर्णधार हा मराठमोळा ऋतुराज गायकवाड असणार आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत सीएसके संघ ऋतुराजच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. कॅप्टन्सच्या फोटोशूटनंतर चेन्नई संघाच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून ही घोषणा करण्यात आली आहे.
सीएसकेला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनी आगामी हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. धोनीने ही जबाबदारी सोडण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही आयपीएल 2022 मध्ये संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदात बदल केले होते. धोनीच्या जागी रवींद्र जडेजाला कर्णधार पद देण्यात आले होते.
मात्र जडेजा ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकला नाही आणि संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच संघ सोडला आणि कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली. गेल्या मोसमात संघाने पाचवे विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या हंगामात सहाव्या विजेते पदाची आशा चाहते व्यक्त करत असून, ती पूर्ण होईल का असा सवाल देखील आता विचारला जात आहे.
धोनीने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कर्णधारांच्या फोटोशूटलाही हजेरी लावली नाही. त्याच्या जागी ऋतुराज गायकवाड दिसला, तेव्हापासून CSK च्या कर्णधार बदलाची चर्चा सुरू झाली होती. गुरुवारी आयपीएलने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये पुष्टी केली की धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे.
आणखी वाचा :
IPL 2024 : क्रिकेटच्या रणसंग्रामची अंतिम यादी जाहीर , तुमचा आवडता खेळाडू कोणत्या संघात? जाणून घ्या
IPL 2024 : अवघ्या ४८ तासात सुरु होणार क्रिकेटचा रणसंग्राम ; पहिली लढत CSK विरुद्ध RCB