यूट्यूबर मिस्टर बीस्टच्या ग्लोबल ड्रायव्हिंग चॅलेंजदरम्यान एका स्पर्धकाची लॅम्बोर्गिनी गाडी भारतात एका दुचाकीला धडकली. या अपघातात केशरी रंगाच्या लॅम्बोर्गिनीचे नुकसान झाले असून, चिडलेल्या स्पर्धकाचा गाडीची तपासणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात चूक कोणाची यावरून सोशल मीडियावर वाद सुरू आहे.
यूट्यूब स्टार मिस्टर बीस्टच्या एका हाय-स्टेक्स ड्रायव्हिंग चॅलेंजला भारतात एक अनपेक्षित वळण मिळाले. या स्पर्धेतील एका लॅम्बोर्गिनी कारला दुचाकी धडकल्याची माहिती समोर आली आहे. या महागड्या कारचे नुकसान पाहून एक स्पर्धक चांगलाच वैतागलेला दिसला. ही घटना मिस्टर बीस्टच्या नुकत्याच आलेल्या 'Drive Around Earth In Lamborghini, Keep It!' या यूट्यूब व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाली असून, ती सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
या चॅलेंजमध्ये दोन स्पर्धकांना जगभरातून लॅम्बोर्गिनी चालवत प्रवास करायचा आहे. नियम अगदी सोपा आहे: जो कोणी हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करेल, त्याला ती लक्झरी गाडी बक्षीस म्हणून मिळेल.
भारतातील प्रवासादरम्यान एक स्पर्धक केशरी रंगाची लॅम्बोर्गिनी चालवत असताना, रस्त्यावर एका दुचाकीने त्याला धडक दिली. या घटनेनंतर तो स्पर्धक खूपच निराश झाला होता. व्हिडिओमध्ये तो डोक्याला हात लावून गाडीचे नुकसान पाहताना दिसत आहे.
या धडकेमुळे कारच्या डाव्या बाजूला एक मोठे भोक आणि अनेक ओरखडे पडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना तो स्पर्धक म्हणाला, "माझ्या गाडीवर एकही ओरखडा नसताना मी आशियात आलो, पण आता तसं म्हणता येणार नाही."
या अपघाताला नक्की कोण जबाबदार होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या घटनेत कोणीही जखमी झाल्याची कोणतीही माहिती नाही.
हा धक्कादायक व्हिडिओ पाहा
काही प्रेक्षकांनी या स्पर्धकाच्या गाडी चालवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याच्या चुकीमुळेच हा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात असून सोशल मीडियावर यावर मोठी चर्चा सुरू आहे.
एका एक्स युझरने म्हटले, "हे 100% त्याचं चुकलं होतं, फक्त कंटेटसाठी हा सर्व मूर्खपणा करतात, अत्यंत घाणेरडे लोक आहेत." दुसऱ्या एका युझरने त्याच्या ड्रायव्हिंगवर टीका करत लिहिले, "हसून हसून वाट लागली, इंडिकेटर न देता किंवा आरशात न बघता थेट फास्ट लेनमध्ये जाणं हा अत्यंत मूर्खपणा आहे. त्याला हेच मिळायला हवं होतं."
तिसऱ्या एका व्यक्तीने परदेशातील गाडी चालवण्याचा अनुभव शेअर करत म्हटले, "आम्हाला सर्वत्र बघायला शिकवलं जातं आणि फक्त सिग्नल किंवा नियमांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं जातं, पण त्यांना वेगळंच शिकवलं जातं. माझ्या यूकेच्या मित्राने ग्रीन सिग्नल असूनही डावी-उजवीकडे पाहिल्यामुळे तो ड्रायव्हिंग टेस्टमध्ये जवळजवळ नापास झाला होता, हे मला आठवतंय."
मिस्टर बीस्टच्या चॅलेंजचा व्हिडिओ पाहा

या घटनेवरून ऑनलाइन बरीच टीका आणि चर्चा सुरू असली तरी, उपलब्ध व्हिडिओमध्ये अपघाताची संपूर्ण घटना कशी घडली हे स्पष्ट होत नाही.


