एका कर्मचाऱ्याला लंच ब्रेक न घेता काम करून लवकर घरी जाण्याची सवय होती. यामुळे त्याला चक्क नोकरीवरून काढण्यात आलं आहे. या घटनेचा ईमेल सध्या व्हायरल होत असून, कॉर्पोरेट नियम आणि कर्मचाऱ्यांच्या स्वातंत्र्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : लंच ब्रेक न घेता काम करून ऑफिसमधून लवकर निघून जाणाऱ्या एका कर्मचाऱ्याला चक्क नोकरीवरून काढण्यात आलं आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर सध्या मोठी चर्चा रंगली आहे.
प्रतीक शेट्टी नावाच्या एका लिंक्डइन युजरने या कर्मचाऱ्याला पाठवलेल्या टर्मिनेशन ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 'Immediate Termination – Violation of Office Policy' असा विषय असलेल्या या ईमेलमध्ये कंपनीने कर्मचाऱ्याला कामावरून का काढलं, याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
ईमेलनुसार, या कर्मचाऱ्याची कामाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 अशी होती. दुपारी 1 ते 2 या वेळेत लंच ब्रेक घेण्याऐवजी, हा कर्मचारी डेस्कवर जेवत जेवत काम करत होता. लंच ब्रेक न घेतल्यामुळे त्याचं काम लवकर संपत असे. त्यामुळे तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबण्याऐवजी 5 वाजताच ऑफिसमधून निघून जायचा.
काम लवकर संपलं तरी लवकर जाता येणार नाही - कंपनी
कर्मचाऱ्याने असं वारंवार लवकर जाणं मॅनेजमेंटला अजिबात पटलं नाही. ईमेलमध्ये कंपनीने यावर नाराजी व्यक्त केली आहे. या कर्मचाऱ्याचं बघून इतर काही कर्मचाऱ्यांनीही हीच सवय लावून घेतल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
लंच ब्रेकच्या वेळेत काम संपवलं, याचा अर्थ ऑफिशियल कामाचे तास कमी करण्याची परवानगी मिळते, असं होत नाही, असा युक्तिवाद कंपनीने केला आहे. ऑफिसच्या वेळा आणि नियम मॅनेजमेंट ठरवतं आणि ते सर्वांनी पाळलेच पाहिजेत, मग काम संपलेलं असो वा नसो, असं कंपनीने ईमेलमध्ये ठणकावून सांगितलं आहे.
ईमेलमधील एका वाक्याने तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यात लिहिलंय, “हे ऑफिस तुमच्या मालकीचं नाही. नियम आम्ही बनवतो, आणि तुम्हाला ते पाळावे लागतील.” याच कारणासाठी संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ प्रभावाने नोकरीवरून काढत असल्याचं ईमेलच्या शेवटी सांगण्यात आलं आहे.
व्हायरल ईमेलमुळे कॉर्पोरेट नियमांवर वाद
या घटनेमुळे सोशल मीडियावर लोकांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. काही जण कर्मचाऱ्याला चुकीचं म्हणत आहेत, तर काही जण कंपनीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.
अनेकांच्या मते, कर्मचाऱ्याला लगेच नोकरीवरून काढण्याऐवजी वॉर्निंग किंवा ऑफिस टायमिंगची आठवण करून द्यायला हवी होती. लंच ब्रेकच्या वेळेत काम संपवण्याचं कौतुक करण्याऐवजी त्याला गैरवर्तन कसं मानलं जाऊ शकतं, असा सवालही काहींनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे, काही जणांनी कंपनीची बाजू घेत म्हटलंय की, काम लवकर संपलं तरी परवानगीशिवाय आधीच निघून जाणं चुकीचं आहे. लंच ब्रेक न घेणं हा मुख्य मुद्दा नसून, ऑफिशियल वेळेच्या एक तास आधी निघून जाणं हा खरा प्रॉब्लेम असल्याचं काहींनी निदर्शनास आणून दिलं.
या प्रसंगामुळे कॉर्पोरेट कल्चर, कर्मचाऱ्यांची लवचिकता, कामाचा वेग आणि ऑफिसचे नियम पाळणं किती महत्त्वाचं आहे, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या व्हायरल ईमेलची सत्यता, कंपनीचं नाव आणि त्या कर्मचाऱ्याला आधी काही वॉर्निंग दिली होती का, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.











