पश्चिम बंगालच्या दिघा बीचवर एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. फोटो काढत असताना आई आणि मुलगी अचानक आलेल्या मोठ्या लाटेच्या तडाख्यात सापडून समुद्रात पडले. लाटा त्यांना ओढून नेत असतानाही आईने आपल्या मुलीचा हात घट्ट धरून ठेवला. अखेर स्थानिकांनी धाव घेत दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दिघा बीचवर एक भयंकर घटना घडली आहे. समुद्राच्या अजस्र लाटांनी आई आणि मुलीला कित्येकदा ओढून नेण्याचा प्रयत्न केला, पण आईने आपल्या मुलीचा हात घट्ट धरून ठेवला. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
फोटो काढण्याच्या नादात झाला अपघात
समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकावर बसून फोटो काढताना आई आणि मुलीला अचानक एका मोठ्या लाटेने धडक दिली. लाटेचा वेग इतका जास्त होता की दोघीही खडकावरून थेट समुद्रात कोसळल्या. त्यानंतर येणाऱ्या लाटा त्यांना एकदा समुद्रात आत ओढत होत्या, तर कधी किनाऱ्यावर ढकलत होत्या. या संकटातही आईने मुलीचा हात अजिबात सोडला नाही. लांबून ही घटना पाहणाऱ्या लोकांच्या किंचाळ्या व्हिडिओत स्पष्ट ऐकू येत आहेत.
अखेर बचावकार्य यशस्वी
जेव्हा दोघी किनाऱ्याजवळ आल्या, तेव्हा एका व्यक्तीने मदतीसाठी धाव घेतली. पण तेवढ्यात पुन्हा एक जोरदार लाट आली आणि तिने पुन्हा त्या दोघींना समुद्रात खेचले. त्यानंतर आणखी काही लोक मदतीसाठी पुढे आले. लाटेच्या जोरामुळे अनेकदा प्रयत्न फसला, पण अखेर स्थानिकांनी मिळून आई आणि मुलीला सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश मिळवले.
२४ नोव्हेंबरला एमजी नावाच्या एका एक्स (X) युजरने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्यांनी एकच इशारा दिलाय की, फोटो किंवा सेल्फी काढण्याच्या नादात समुद्राच्या जवळ जाऊ नका. विशेषत: जेव्हा लाटा मोठ्या असतात आणि भरतीची वेळ असते, तेव्हा खूप काळजी घेतली पाहिजे. समुद्राच्या ताकदीला कधीही कमी लेखू नका, असा महत्त्वाचा धडा या घटनेतून मिळतो.
















