उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये थार गाडीच्या टपावर डान्स करून रुग्णवाहिका अडवल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत रुग्णवाहिकेतील रुग्णालाही वाट मिळाली नाही. तरुणांच्या या बेजबाबदार कृत्यावर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशाच प्रकारच्या घटना याआधी सुरत आणि ग्रेटर नोएडा येथेही घडल्या आहेत.
दोन रुग्णवाहिकांचा रस्ता अडवून काही तरुण थार गाडीच्या टपावर डान्स करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील बाबुगड भागातील बछरौता गावात घडली. व्हिडिओमध्ये हे तरुण त्यांची थार गाडी रस्त्याच्या मध्यभागी पार्क करून टपावर चढून डान्स करताना दिसत आहेत. मागून दोन रुग्णवाहिका सायरन वाजवत येत असतानाही गाडीतील तरुण बाजूला सरकण्यास तयार नाहीत.
एका रुग्णवाहिकेत रुग्ण होता. सायरन वाजत असूनही तरुण गाडीवर डान्स करत राहिले, ज्यामुळे रुग्णवाहिकांना उशीर झाला आणि वाहतूकही खोळंबली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी या तरुणांच्या बेजबाबदार वागणुकीवर आणि तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या व्यक्तींबद्दलच्या त्यांच्या अनास्थेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
पाहा व्हायरल व्हिडिओ
याआधीच्या अशाच घटना
याच महिन्याच्या सुरुवातीला दिवाळीच्या रात्री एका हाताने थार चालवताना आणि आकाशात फटाके फोडतानाचा एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर सुरतमध्ये एका तरुणाला अटक करण्यात आली होती. या धोकादायक कृत्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या आणि दुचाकींना धोका निर्माण झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. एका चुकीमुळे मोठा अपघात होऊ शकला असता, असंही ते म्हणाले.
काही महिन्यांपूर्वी, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एका पेट्रोल पंपावरून पैसे न देता पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका थार चालकाला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने एका मोटारसायकलला अनेक किलोमीटरपर्यंत महामार्गावरून फरफटत नेलं होतं.
ही घटना धूम माणिकपूर भागातील एका इंधन पंपावर घडली होती. हर्ष (वय २२, रा. सिकंदराबाद) असं या चालकाचं नाव होतं. त्याने त्याच्या काळ्या महिंद्रा थारमध्ये डिझेल भरलं आणि पैसे देण्याची वेळ आली तेव्हा ऑनलाइन बिल भरण्याचं नाटक करून पैसे न देताच तिथून पळ काढला होता.










