आम आदमी पार्टीचे मोठे नेते राघव चढ्ढा यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत संदीप पाठक आणि अशोक मित्तल हेही भाजपमध्ये सामील होणार असल्याने 'आप'च्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
AAP Rajya Sabha MPs BJP Merger: दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात शुक्रवारी मोठा भूकंप झाला. आम आदमी पार्टीचा (AAP) प्रमुख चेहरा असलेले राघव चढ्ढा यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याची घोषणा केली. त्यांच्यासोबत राज्यसभा खासदार संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. या घडामोडींमुळे आम आदमी पार्टीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः राघव चढ्ढा हे बऱ्याच काळापासून पक्षाच्या सर्वात विश्वासू आणि तरुण चेहऱ्यांपैकी एक मानले जात होते.
राज्यसभेतील दोन-तृतीयांश सदस्य भाजपमध्ये विलीन होणार
पत्रकार परिषदेत बोलताना राघव चढ्ढा म्हणाले की, त्यांनी, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी मिळून निर्णय घेतला आहे की, राज्यसभेतील आम आदमी पार्टीचे दोन-तृतीयांश सदस्य भारतीय संविधानातील तरतुदींचा वापर करून भाजपमध्ये विलीन होतील. इतकंच नाही, तर स्वाती मालीवाल यासुद्धा भाजपमध्ये सामील होतील, असा दावाही त्यांनी केला. हे विधान राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे, कारण याचा थेट परिणाम राज्यसभेतील 'आप'च्या संख्याबळावर होऊ शकतो.
“चुकीच्या पक्षात असलेला योग्य माणूस”
राघव चढ्ढा म्हणाले की, त्यांनी आपल्या “रक्त आणि घामा”ने पक्ष वाढवला आणि आपल्या तरुणपणीची १५ वर्षे 'आप'ला दिली. पण आता पक्ष आपल्या मूळ तत्त्वांपासून, मूल्यांपासून आणि नैतिकतेपासून भरकटला आहे. पक्ष आता राष्ट्रीय हितासाठी नाही, तर वैयक्तिक फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना आता असं वाटू लागलं आहे की, ते “चुकीच्या पक्षात असलेले योग्य व्यक्ती” बनून राहिले आहेत. हे विधान थेट 'आप'च्या नेतृत्वावर, विशेषतः अरविंद केजरीवाल यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं मानलं जात आहे.


