Lulu Group : लुलू ग्रुपने ५१९.४१ कोटी रुपयांना १६.३५ एकर जमीन खरेदी करून अहमदाबादच्या इतिहासातील सर्वात मोठा जमिनीचा सौदा केला आहे. या एकाच व्यवहारातून सरकारला ३१ कोटी रुपयांचा विक्रमी मुद्रांक शुल्क महसूल मिळाला आहे.
Lulu Group : गुजरातमधील गांधीनगरच्या चांदखेडा येथे लुलू ग्रुपने केलेला जमिनीचा व्यवहार हा अहमदाबादच्या इतिहासातील सर्वात मोठा भूखंड विक्री ठरला आहे. लुलू ग्रुपने ५१९.४१ कोटी रुपयांना १६.३५ एकर (६६,१६८ चौरस मीटर) जमीन खरेदी केली आहे. लुलूच्या या एकाच व्यवहारामुळे सरकारला अक्षरशः बंपर लॉटरी लागली आहे. या एकाच व्यवहारातून सरकारला ३१ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल मिळाला आहे. याने अहमदाबादमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक मुद्रांक शुल्क महसुलाचा विक्रमही केला आहे. साबरमती उप-निबंधक कार्यालयात नोंदणीकृत झालेली ही विक्री, रक्कम आणि मुद्रांक शुल्काच्या बाबतीत अहमदाबादच्या इतिहासातील सर्वात मोठा जमिनीचा व्यवहार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे राष्ट्रीय माध्यमांनी वृत्त दिले आहे.
लीजवर नाही, थेट विक्री
लुलूने ही जमीन १८ जून २०२४ रोजी अहमदाबाद महानगरपालिकेच्या लिलावातून खरेदी केली. प्रति चौरस मीटर ७८,५०० रुपये दराने खरेदी केलेल्या या जमिनीला, ९९ वर्षांच्या लीजऐवजी थेट विक्रीसाठी सरकारने परवानगी दिली होती. नगर नियोजन योजनेच्या नियमांचे पालन करून झालेली ही विक्री, शहरात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाचा एक भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. यापूर्वी अहमदाबाद शहरात ३०० आणि ४०० कोटींचे जमिनीचे व्यवहार नोंदवले गेले असले तरी, ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अहमदाबादमध्ये मोठ्या अपेक्षा
या जमीन व्यवहारामुळे गुजरातमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याचे लुलू ग्रुपचे उद्दिष्ट आहे. एसपी रिंग रोडला लागून असलेली ही जागा मोठ्या प्रकल्पांसाठी अनुकूल आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी आणि महामार्गाच्या सुविधांमुळे व्यावसायिक संधींचे मोठे जग खुले झाले आहे. लुलू ग्रुप येथे एक मोठा मॉल, हायपरमार्केट आणि इतर व्यावसायिक उपक्रम सुरू करण्याची योजना आखत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मतदारसंघातील गांधीनगरमध्ये येणारी ही जागा, लुलूच्या गुजरातमधील व्यावसायिक विस्ताराच्या योजनांसाठी सामरिक महत्त्व देते. लुलू ग्रुपचा भव्य मॉल आल्याने अहमदाबादच्या आर्थिक वाढीला आणि व्यावसायिक विकासाला मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. लुलूच्या या निर्णयामुळे गुजरातच्या व्यापार-वाणिज्य क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील आणि शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला बळकटी मिळेल हे निश्चित आहे. या विक्रमी जमीन व्यवहारामुळे, अहमदाबादमधील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणून 'लुलू' उदयास येईल अशी आशा आहे.


