उत्तर प्रदेशच्या लखनौमधील जनेश्वर मिश्रा पार्कजवळ एका महिलेला कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वादावादीनंतर कार चालकाने तिला बोनेटवरून काही अंतर फरफटत नेलं.

लखनौ: उत्तर प्रदेशच्या लखनौमधील जनेश्वर मिश्रा पार्कजवळ एका महिलेला कारने धडक देऊन बोनेटवरून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या महिलेने आपल्या पार्टनरला दुसऱ्या एका महिलेसोबत कारमध्ये पाहिलं. त्यानंतर तिने त्याची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात चालकाने कारचा वेग वाढवला. त्याने महिलेला धडक दिली आणि ती बोनेटवर पडल्यानंतरही कार तशीच पुढे नेली.

बोनेटवरून फरफटत गेल्यानंतर ती महिला खाली पडली. त्यानंतरही चालकाने तिच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.

Scroll to load tweet…

या घटनेनंतर चालकाने जखमी महिलेला तिथेच सोडून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी लगेच तिथे गर्दी केली आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

या सगळ्यात महिला जखमी झाली असून, पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.