Lucknow Family Suicide Mother and Son Die After Consuming Poison Father Critical: लखनऊच्या बंथरा भागातील नींवा गावात एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्यायलं. यात आई आणि मुलाचा मृत्यू झाला, तर वडिलांची प्रकृती गंभीर आहे. मुलाच्या खिशात एक सुसाइड नोट सापडली असून, आर्थिक अडचण आणि बँकेच्या कर्जामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Banthra Lucknow Suicide Case: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथे एकाच कुटुंबातील तीन जणांनी विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे, तर वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, हे कुटुंब आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलं होतं.

लहान मुलाने पाहिलं आणि पोलिसांना कळवलं

ही घटना बंथरा भागातील नींवा गावात शुक्रवारी घडली. मृत्यू झालेल्यांची नावं तारावती (५२) आणि त्यांचा मुलगा संदीप (३०) अशी आहेत. तर, कुटुंबाचे प्रमुख रूपनारायण (५५) यांची प्रकृती गंभीर आहे. कुटुंबातील लहान मुलगा कुलदीप याने सर्वात आधी घरातील ही भयंकर परिस्थिती पाहिली. त्याने सांगितलं की, त्याचे वडील रूपनारायण उलट्या करत होते. तर आई आणि मोठा भाऊ संदीप बेशुद्ध अवस्थेत पडले होते आणि त्यांच्या तोंडातून फेस येत होता. हे पाहून कुलदीप प्रचंड घाबरला आणि त्याने लगेच UP Dial 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली.

हॉस्पिटलमध्ये आई-मुलाला मृत घोषित केलं

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिघांनाही तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी करून आई तारावती आणि मुलगा संदीप यांना मृत घोषित केलं. तर, वडील रूपनारायण यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुलाच्या खिशात सापडली सुसाइड नोट

पोलिसांच्या तपासात एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. मृत संदीपच्या खिशात एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यावर लिहिलं होतं - "आमच्या मृत्यूसाठी आम्ही स्वतः जबाबदार आहोत." पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या चिठ्ठीचीही फॉरेन्सिक तपासणी केली जाईल.

चहा-समोशाचं छोटं हॉटेल चालवत होतं कुटुंब

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपनारायण गावाबाहेर चहा आणि समोशाचं एक छोटं हॉटेल चालवत होते. यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. असं सांगितलं जातंय की, कुटुंबाने बँकेकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाची रक्कम फेडण्यात अडचणी येत असल्याने रूपनारायण गेल्या काही दिवसांपासून खूप तणावात आणि शांत राहत होते. याच आर्थिक दबावामुळे कुटुंबाने हे टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांचं म्हणणं आहे की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. कुटुंबातील इतर सदस्य आणि आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली जात आहे. सध्या सुसाइड नोट सापडल्याने हे प्रकरण आर्थिक चणचण आणि कर्जाच्या दबावाशी संबंधित असल्याचं मानलं जात आहे. तरीही पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Disclaimer: आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. तुमच्या मनातही आत्महत्येचे किंवा स्वतःला इजा पोहोचवण्याचे विचार येत असतील, तर तुम्ही ताबडतोब कुटुंब, मित्र आणि मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही या हेल्पलाइन नंबरवर कॉल करूनही मदत मागू शकता. आसरा (मुंबई) 022-27546669, सुमैत्री (दिल्ली) 011-23389090, रोशनी (हैदराबाद) 040-66202000, लाइफलाइन 033-64643267 (कोलकाता). मानसिक तणाव असल्यास काउन्सिलिंगसाठी हेल्पलाइन नंबर 14416 आणि 1800 8914416 वर संपर्क साधून घरबसल्या मदत मिळवू शकता.