“काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या...”, मोदींनी दिली शरद पवारांना ऑफर

| Published : May 10 2024, 02:33 PM IST

Narendra Modi, Sharad Pawar

सार

नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं. थेट शरद पवारांनाच एनडीएमध्ये येण्याची मोठी ऑफर मोदींनी दिली आहे.

नंदूरबार : नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं. थेट शरद पवारांनाच एनडीएमध्ये येण्याची मोठी ऑफर मोदींनी दिली आहे. नंदूरबारमधील प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटावर टीका केली. “नकली शिवेसना मला जिवंत गाडण्याची भाषा करते. मात्र, मी बाळासाहेब ठाकरे यांना जवळून पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आज किती दु:ख होत असेल, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. यानंतर त्यांनी शरद पवारांच्या विधानावर भाष्य केले.

मोदी काय म्हणाले?

“४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक मोठे नेते राजकारणात आहेत. सध्या ते काहीही भाष्य करत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत असावेत. त्यांनी अनेक चांगल्या लोकांबरोबर काही विचार विनिमय करून त्यांनी ते विधान केले असावे. ४ जूननंतर राजकारणात टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागू शकतं, असं त्यांना वाटलं असेल, असंही मोदी म्हणाले.

“छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केलं आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

नेमकं शरद पवार काय म्हणाले होते?

“पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील, किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटेल”, असे ते म्हाणाले होते. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. मी आता काहीही बोलत नाही. सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही त्यांच्या (काँग्रेसच्या) जवळ आहोत. पक्षाबाबतचे पुढील सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील”, असे सूचक भाष्य शरद पवार यांनी केले होते.