ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सोमवारी (१३ एप्रिल २०२६) संध्याकाळी ४ वाजता मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भारतीय संगीत विश्वासाठी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ आणि लाडक्या गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी या बातमीला दुजोरा दिला असून, मुंबईतील शिवाजी पार्क इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, असं सांगितलं. काही दिवसांपूर्वीच प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास आठ दशकं त्यांनी आपल्या आवाजाने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या निधनामुळे संगीतप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

आशा भोसले यांच्या मुलाने सांगितली अंत्यसंस्काराची वेळ

आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे, "त्या आता आपल्यात राहिल्या नाहीत. त्यांचे अंत्यसंस्कार उद्या (सोमवार, १३ एप्रिल २०२६) संध्याकाळी ४ वाजता मुंबईच्या शिवाजी पार्कवर होतील." आशा भोसले यांना ११ एप्रिल रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

आशा भोसले यांची ८ दशकांची सोनेरी कारकीर्द

आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी १९४३ साली आलेल्या 'माझा बाळ' या मराठी सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं होतं. आपल्या ८ दशकांच्या मोठ्या कारकिर्दीत त्यांनी ११ हजारांहून अधिक गाण्यांना आवाज दिला. यामध्ये 'पिया तू अब तो आजा', 'कजरा मोहब्बत वाला', 'रंगीला रे' आणि 'दिल चीज क्या है' यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे. त्यांनी प्रत्येक प्रकारच्या गाण्यांमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवली.