जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी झाल्याने तीन भाविकांचा मृत्यू झाला असून १० जखमी झाले आहेत. रथाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाल्याने बॅरिगेट्स तुटून भाविक एकमेकांवर पडले. घटनास्थळी रुग्णवाहिका नसल्याने जखमींना उचलून रुग्णालयात नेण्यात आले.

पुरी - जगन्नाथ यात्रा जगात प्रसिद्ध आहे. या यात्रेला जगभरातून भाविक येत असतात. यावर्षी प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडली आहे. येथे झालेल्या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला असून १० भाविक जखमी झाले. हि घटना घडल्यानंतर भाविकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी पहाटे ही दुर्घटना घडली असून जास्त भाविकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भाविकांनी मोठ्या प्रमाणावर केली गर्दी 

भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. येथे रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्यामुळे ते एकमेकांवर पडले आणि बॅरिगेट्स तुटले. त्यानंतर ढकला ढकली झाल्यामुळे नंदीघोष रथाच्या चाकाजवळ अनेक भाविक एकमेकांच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत भाविकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत.

रुग्णवाहिका नसल्यामुळे भाविकांनी जीव गमावला 

घटनास्थळी कोणतीही रुग्णवाहिका किंवा हॉस्पिटलची सुविधा नसल्यामुळे जखमींना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अनेक जखमींची प्रकृती ही चिंताजनक असल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. रथयात्रेत झालेल्या दुर्घटनेमुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे.