जबलपूरमध्ये एका व्यावसायिकाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत २० लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पूजा प्रकाश असं या महिलेचं नाव असून, ७ लाखांची तडजोड झाल्यानंतर पहिला हप्ता म्हणून २.५ लाख रुपये घेताना तिला रंगेहाथ पकडण्यात आलं. या अटकेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूर पोलिसांनी पूजा प्रकाश नावाच्या एका महिलेला अटक केली आहे. सार्थक सिंग या रिअल इस्टेट व्यावसायिकाने तिच्यावर ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा आरोप केला होता. सार्थकने दिलेल्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये एका डान्स प्रोग्राममध्ये त्याची पूजाशी ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघे सतत संपर्कात होते. पूजाने सार्थकला खोट्या बलात्काराच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली आणि सुरुवातीला २० लाख रुपयांची मागणी केली. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, नंतर ही रक्कम ७ लाख रुपयांवर ठरली.
२.५ लाखांची मागणी आणि पोलिसांचा सापळा
सार्थकच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लगेच कारवाई करत पूजाला रंगेहाथ पकडण्यासाठी एक सापळा रचला. गुरुवारी पूजा सार्थकला एका हॉटेलमध्ये भेटली आणि तिने पहिला हप्ता म्हणून २.५ लाख रुपये घेतले. ती हॉटेलमधून बाहेर पडत असतानाच साध्या वेशातील पोलिसांनी तिला अडवलं आणि बेड्या ठोकल्या. तिच्याकडून हे २.५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. पूजा सार्थकला त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन स्वतःशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती, असं पोलिसांनी सांगितलं. सध्या पूजाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अटकेच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर चर्चा
या अटकेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस अधिकारी पूजाला कानशिलात लगावताना दिसत आहे. यावरून नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
काही युजर्सनी या महिला अधिकाऱ्याचं कौतुक करत ही कारवाई योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे, काहींनी पोलिसांच्या या मारहाणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आरोप सिद्ध होईपर्यंत कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करायला हवा, असं त्यांचं म्हणणं आहे.
एका युजरने कमेंट केली की, पोलिसांनी मारहाण करण्यापेक्षा आरोपांची सखोल चौकशी करायला हवी. तर दुसऱ्या एकाने, व्यावसायिकाच्या पैशामुळे पोलिसांनी अशी तत्पर कारवाई केली का? असा सवाल उपस्थित केला आहे.
सध्या पूजावरील आरोपांची चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे.
