सार
एकत्र शाळेत गेले , कॉलेज एकत्र शिकलो, एकाच दिवशी ड्युटी जॉईन केली आणि एकत्र रिटायर झालो, भीम आणि अर्जुन या दोन भावांची कहाणी चित्रपटांसारखीच आहे....जाणून घ्या या जुळ्या भावांची कहाणी
जुळ्या मुलांबद्दल तुम्ही खूप काही ऐकलं आणि वाचलं असेल. तसेच जुळ्या मुलांवर अनेक चित्रपट देखील बनवण्यात आले आहेत.पण चित्रपट आणि खऱ्या आयुष्यात जगणाऱ्या जुळ्या मुलांची कहाणी खूप वेगळी असते. अशीच कहाणी आहे राजस्थानमधील दोन जुळ्या भावांची. एकत्र जन्माला आले, एकत्र वाढले, एकत्र शाळेत शिकले आणि एकत्र नौकरीलाही लागले तेही एकाच ठिकाणी आणि एकाच क्षेत्रात,पण यातील रंजक बाब म्हणजे दोघंही एकाच वेळी सेवानिवृत्त झाले आहेत. आहे की नाही चित्रपटालाही लाजवणारी कथा ! भीम आणि अर्जुन असं या भावांचं नाव आहे, ते दोघेही राजस्थान पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबल पदावरून 30 एप्रिल रोजी निवृत्त झाले.
भीम आणि अर्जुनचा जन्म 25 एप्रिल 1964 रोजी राजस्थामधील अलवार जिल्ह्यातील मुंडावार शहरात झाला होता. त्यानंतर ते दोघे एकत्र शाळेत शिकू लागले, एकत्र महाविद्यालयात गेले आणि त्यानंतर 1986 मध्ये एकत्र राजस्थान पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. भीम यांची पहिली पोस्टिंग टोंक जिल्ह्यात आणि अर्जुनला पहिली पोस्टिंग अलवरमध्ये मिळाली होती. त्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात काम केले. आता गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही अलवर येथील पोलीस लाईनमध्ये तैनात होते. दरम्यान, दोन्ही भावांनाही बढती देण्यात आली आणि दोघांना कॉन्स्टेबलमधून हेड कॉन्स्टेबल करण्यात आले. आता 38 वर्षे पोलिस सेवेनंतर दोघेही 30 एप्रिल रोजी एकत्र सेवानिवृत्त झाले आहेत.
भीम आणि अर्जुनाचे संपूर्ण कुटुंब उच्च शिक्षित :
भीम आणि अर्जुन यांना पाच मुले आहेत. मोठा भाऊ भीम यांना दोन मुले आहेत, त्यापैकी एक सैन्यात वैद्यकीय सुभेदार आहे आणि सून नर्सिंग ऑफिसर आहे. धाकटा मुलगा विकी रेल्वेत तर सून खासगी शिक्षिका आहे. लहान भाऊ अर्जुनला दोन मुले आहेत. मोठा मुलगा प्रतीक राजस्थान पोलिसात तर सून खासगी शिक्षिका आहे. लहान मुलगा पीयूष सीआरपीएफमध्ये असून देश सेवा करत आहे.
दोघं भावांबद्दल एकही तक्रार नाही :
भीम आणि अर्जुनच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या ३८ वर्षांच्या सेवेत दहापेक्षा जास्त वेळा पोस्टिंग आणि बदल्या झाल्या. मात्र निम्म्याहून अधिक बदल्यांमध्ये दोन्ही भाऊ एकत्र राहिले. कधी कोणाच्या विरोधात तक्रार नव्हती. ट्रॅक रेकॉर्ड पूर्णपणे स्वच्छ राहिला. आता दोघेही गावात बांधलेल्या घरात राहत आहेत.