कर्नाटकातल्या दावणगेरेमध्ये गाडीच्या धडकेत जखमी झालेल्या एका बिबट्याने बचावकार्य करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यावरच हल्ला केला. या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यात अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असलेला बिबट्या अधिकाऱ्याच्या अंगावर झेप घेताना दिसतोय.
कर्नाटकातल्या दावणगेरेमध्ये हायवेवर एका गाडीने धडक दिल्यामुळे जखमी झालेल्या बिबट्याने बचाव मोहिमेदरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला. या नाट्यमय घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अपघातानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना रस्त्यावर जखमी बिबट्या आढळला. त्याला बेशुद्धीचं इंजेक्शन (tranquillizer) देऊन पकडण्याचा आणि उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा पथकाचा प्रयत्न होता.
पण बेशुद्धीचं औषध पूर्णपणे लागू होण्याआधीच, बिबट्याने अचानक एका अधिकाऱ्यावर झेप घेतली. व्हिडिओमध्ये दिसतंय की, बिबट्याच्या झेपेमुळे तो अधिकारी जमिनीवर कोसळला. पण त्याच्या सहकाऱ्यांनी लगेचच धाव घेतली आणि एका काठीच्या मदतीने बिबट्याचं लक्ष विचलित करून त्याला पळवून लावलं. त्यानंतर बिबट्या गर्दीपासून दूर गेला आणि तो अधिकारी पुन्हा उभा राहिला.
यानंतर, जखमी बिबट्या रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतात जाऊन लपला, जिथे बचाव पथकाने त्याला सुरक्षितपणे पकडण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर त्याला पकडण्यात यश आलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
व्हायरल व्हिडिओ पाहा
या घटनेनंतर, अशा मोहिमांमध्ये वन्यजीव आणि बचावकर्त्यांना येणाऱ्या धोक्यांबद्दल ऑनलाइन चर्चा सुरू झाली आहे. तसेच, हायवे आणि इतर पायाभूत सुविधांचा प्राण्यांवर कसा परिणाम होतो, याबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे ज्या भागांमधून हायवे जातात, तिथे वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना किती महत्त्वाच्या आहेत, हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका युझरने लिहिलं, "बचावकार्यात असं घडतंच. माणसांच्या अविचारी हस्तक्षेपामुळे आणि विकासाच्या नावाखाली उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांमुळे भविष्यात अशा घटना आणखी वाढलेल्या दिसतील."
दुसऱ्या एका युझरने कमेंट केली, "खरा गुन्हा तर त्या ड्रायव्हरने केलाय, जो धडक देऊन निघून गेला. वन अधिकारी तर त्यांचं काम करत होते, तरीही त्यांच्यावर हल्ला झाला. आपण त्यांची घरं (जंगलं) बुलडोझरने उद्ध्वस्त केली, त्यामुळेच हे प्राणी हायवेवर यायला मजबूर झालेत, याबद्दल कुणीच बोलत नाही."
